न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी आंदोलनांनी जळगाव दणाणले

न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी आंदोलनांनी जळगाव दणाणले

जळगाव - Jalgaon :

एकलव्य भील्ल समाज संघटना, बहुजन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटना आणि राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेने केलेल्या आंदोलनाने शहर दणाणले.

एकलव्य भिल्ल समाज संघटना

आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीच्या जागा सातबारा नावे लावणे, चालू वर्षात होणार्‍या जनगणनेच्या सर्वेमध्ये जात प्रमाणपत्रावरील हिंदू-भिल्ल ऐवजी आदिवासी भिल्ल अशी जात नोंद करणे यासह विविध मागण्यांसाठी एकलव्य भिल्ल समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील शिवतीर्थ मैदानावरुन सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा जिल्हा क्रिडा संकुल, नवीन बस स्थानक, स्वातंत्र्य चौकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. याठिकाणी संघटनेच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर संघटनेच्या अध्यक्षा सुमित्राबाई पवार, सुर्यकांत पवार, अनिल सोनवणे, किशोर पवार, दिपाली बांडे, मोतीलाल सोनवणे, संजय पवार यांच्या स्वाक्षरी आहेत.

बहुजन कर्मचारी संघटना

राज्यात 7 मे रोजी मागासवर्गीय कर्मचारी व अधिकार्‍यांच्या पदोन्नतीस बाधा आणणारा व पदोन्नती रोखणारा जीआर शासनाने काढला आहे. तो जीआर तात्काळ रद्द करावा. तसेच कर्मचारी हिताचे प्रश्न तात्काळ सोडवावे या मागण्यांसाठी बहुजन कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भास्करराव हिवाळे, प्रकाश पाटील, आनंद विद्यागर, बालाजी राऊत, जगदिश सोनवणे, निलेश चौधरी, अरुण नेरकर, शिवराम पाटील आदी सहभागी झाले होते.

इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटना

केंद्र सरकारच्या वीज कायदा 2021 विधेयक संसदेच्या सुरु असलेल्या सत्रात मंजूरी करून सार्वजनिक मालकीचा वीज उद्योग अनेक तुकडे करून खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा कुटील डाव हाणून पाडण्यासह त्याला विरोध व निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी, 19 जुलै रोजी जळगाव शहरातील अयोध्यानगरातील औद्योगिक वसाहतीमधील महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे निदर्शने करण्यात आली. आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे विभागीय अध्यक्ष कॉम्रेड प्रभाकर महाजन, सचिव कॉम्रेड विरेंद्र पाटील, महिला केंद्रीय कार्यकारिणी सदस्या संध्या पाटील, गणेश बाविस्कर, मंगेश बोरसे, गणेश शेंडे, स्वप्निल बडगुजर, समाधान पाटील, किशोर सपकाळे, महेश बिचवे, विजय टोकरे, किशोर जगताप, राहुल साळुंखे यांच्यासह संघटनेचे सदस्य व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी विरेंद्र पाटील, संध्या पाटील यांनी मनोगत व्यक्त करुन कंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ

राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ जळगाव शहर शाखा व सहयोगी संघटनामार्फत अनु.जाती,जनजाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय कर्मचारी यांच्या संवैधानिक अधिकार संपविण्याचा महाराष्ट्र शासनाच्या धोरणाविरोधात तालुकास्तरीय रॅली काढून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात शामा प्रसाद मुखर्जी उद्यानापासून करण्यात आली. जि.प.जळगाव जुनी इमारत मार्गे जळगाव तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलनकरण्यात आले.रॅली व बोंबाबोंब आंदोलनाचा समारोप नायब तहसिलदार बारी यांना सर्व आरोग्य विभाग राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या रेखा मेश्राम, जयश्री वानखेडे, सुनिता लांडगे,पौर्णिमा सुरवाडे, निशा गाढे, तर राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघाच्या अनिता पेंढारकर, संगिता देहडे, वैशाली देहडे, रोशनी निकम, संघमित्रा इंधाटे, सुमित्र अहिरे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी निवेदन दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com