कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिसचा धोका

जिल्हा प्रशासनाकडून त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर; लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार करा
कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिसचा धोका

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

देशात कोरोनाचे संकट अद्याप टळलेने नसतांना आता नवीन बुरशीजन्य आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात सद्याच्यास्थितीत म्युकरमायकोसिसचे 25 रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून यातील दोन रुग्ण हे कोविड बाधित असतांनाच त्यांना म्युकरमायकोसिसची लागण झाली होती तर चार जण हे कोविडच्या आजारातून बरे झाल्यानंतर त्यांना लागण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. म्युकरमायकोसिचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद असतांनाच पुन्हा एकदा म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीजन्य आजाराने डोकेवर काढले आहे. मधुमेह किंवा शरिरातील साखरेचे प्रमाण वाढलेल्या रुग्णांना या आजाराची लागण सर्वात अगोदर होत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत म्यूकरमायकोसिसच्या 25 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 6 रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही आता म्यूकरमायकोसिसचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढत आहे.

जिल्हा रुग्णालयात कक्ष राखीव

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विशेष कक्ष म्यूकरमायकोसिसचे रुग्ण समोर येऊ लागल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या आजाराच्या रुग्णांसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 7 मध्ये एक विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. येथे म्यूकरमायकोसिसची लक्षणे असलेल्या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा तुटवडा

म्यूकरमायकोसिस रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचारआता म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार होणार आहेत. डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्येही रुग्ण दाखल केले जात आहेत. या आजाराच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या म्फोटेरेसीन बी या इंजेक्शनचा जळगावात देखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. जे रुग्ण दाखल आहेत, त्यांच्यावर इतर गोळ्या-औषधांच्या सहाय्याने उपचार सुरू आहेत.

टास्कफोर्सच्या बैठकीनंतर त्रिसूत्री कार्यक्रम

जिल्हा प्रशासानाकडून टास्कफोर्सच्या बैठका घेण्यात आल्या. यामध्ये उपचारासाठी त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. जेणेकरुन या आजारावरही नियंत्रण मिळवणे शक्य होईल. असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

असा आहे त्रिसूत्री कार्यक्रम

1) ज्या रुग्णांना शुगर, डायबेडीस किंवा जे रुग्ण कोरोनाबाधित असतांना त्यांना स्टेराईडचा वापर अधिक प्रमाणात झाला आहे. त्यांना या आजाराचा धोका सर्वाधिक आहे. अशा रुग्णांची यादी संबंधित रुग्णालयांकडून जिल्हा प्रशासनाने मागविली आहे. त्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांच्यातील संभाव्य रुग्णांची तात्काळ तपासणी करुन म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव रोखता येणार आहे.

2) ज्या रुग्णांना बुरशीजन्य आजार असलेल्या म्युकरमायकोसिसच्या आजाराची लागण झाली आहे. त्यांच्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कक्ष आरक्षित केला आहे. तसेच या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार देखील केले जाणार आहे. तसेच जे रुग्ण कोरोनाबाधित होवून बरे झाले आहेत त्यांनी मातीशी जास्त संपर्कात येवू नये त्यांना या आजाराचा धोका सर्वाधिक आहे.

3) या आजाराची लागण झाल्यानंतर ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांच्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन प्रशासनाने तयार केला आहे. ज्या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार केले जातात. त्याठिकाणी या रुग्णांवर उपचार होणार असून जास्तीत जास्त रुग्णांवर या योजनेतून उपचार व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.

रुग्णसंख्या घटल्याने 23 रुग्णालये नॉन कोविड

दुसर्‍या लाटेत रुग्ण संख्या वाढल्याने जिल्हाभरातील सुमारे 125 खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचारासाठी मान्यता दिली होती. परंतु आता रुग्णालयात कोविडचे रुग्णच येत नसल्याने 23 रुग्णालयांनी सरेंडर केले असून याठिकाणी पुन्हा नॉन कोविड रुग्णांची ओपीडी सुरु झाली आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यातलयात रुग्णांना बेड मिळणे शक्य होत नव्हते मात्र आता याठिकाणावरील सुमारे सव्वाशेपेक्षा अधिक बेड शिल्लक असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराच्या पार्श्वभूमिवर टास्क फोर्सच्या बैठका घेवून त्रिसुत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. सद्यास्थितीत 25 रुग्ण असून, सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. लक्षणे आढळून आल्यास त्वरीत उपचार घ्या.

- अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com