वाळूने भरलेल्या  ट्रॅक्टरच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

खंडेराव नगरातील घटना, ट्रॅक्टर चालक पोलिसात जमा

जळगाव - Jalgaon

बाजारपट्ट्यातून भाजीपाला घेवून सायकलने घरी परणार्‍या प्रौढास वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने दिलेल्या जोरदार धडकेत सायकलस्वार प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास खंडेराव नगरात घडली. मेहबूब आफिसखान वय ५० रा. आझादनगर, पिंप्राळा हुडको असे मयत प्रौढाचे नाव आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पोलिसात जमा झाला होता.

मेहबूब आफिसखान हे भाजीपाला घेण्यासाठी खंडेराव नगर परिसरात आले होते. बाजार घेतल्यानंतर ते त्यांच्याकडील सायकलीने पुन्हा घराकडे परतत होते. यादरम्यान खंडेराव नगरात वाळूने भरुन जाणार्‍या ट्रॅक्टरने आफिसखान यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी जखमी आफिसखान यांना नागरिकांनी ओळखले.

त्यानुसार नागरिकांनी आफिसखान यांचे मित्र सैय्यद तैय्युब तसेच आफिसखान यांचा मुलगा शाहरुख यांना घटनेची माहिती कळविली. माहिती मिळताच सैय्यद तैय्युब तसेच मुलगा शाहरुख यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. जखमी अवस्थेतील आफिसखान यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी आफिसखान यांना मृत घोषित केले. आफिसखान यांच्या पश्‍चात पत्नी तसलीम व दोन मुले शाहरुख व इरफान आहे. दोन मुली विवाहित असून त्या सासरी नांदत आहेत. दोन्ही मुले रिंगरोडवरील एका दुकानात एसी, फ्रिज दुरूस्तीच्या दुकानावर कामाला आहेत. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागतो. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पोलीस ठाण्यात जमा झाला होता. शेवटचे वृत्त आले तोवर याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दिवसरात्र या परिसरातून भरधाव वेगाने वाळूचे ट्रॅक्टर धावतात. अनेकदा बकर्‍यांने चिरडले. आज माणसाला चिरडल्याने अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com