जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

गेल्या चारशे वर्षात न दिसलेल्या गुरु आणि शनीच्या महायुतीचे विलक्षण विलोभनीय दृश्य सोमवार दि.21 डिसेंबर रोजी सायंकाळी सुर्यास्तानंतर पश्चिम दिशेला खगोलप्रेमींना पहावयास मिळणार आहे.

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी हे एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आपल्याला दिसणार आहेत. सूर्याभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी या दोन्ही ग्रहांना वेगवेगळा काळ लागत असला तरी दर 20 वर्षानी ते जवळ आलेले दिसतात. विशेष म्हणजे ते खूपच जवळ येणार आहेत.

साध्या डोळ्यांनी तर ते दिसू शकतील. परंतु खगोलीय घटनांचे दृश्य पहाण्यासाठी उपयोगात येणार्या टेलिस्कोप मधून गुरु त्याच्या चार चंद्रांसह आणि शनी त्याच्या कड्यांसह एकाच वेळी ही महायुती बघता येणार आहे. यापूर्वी दि. 16 जुलै 1623 मधे अशी महायुती झाली होती. यानंतर दि.15 मार्च 2080 मधे ही महायुतीचे दर्शन होणार आहे.

युती आणि महायुती म्हणजे काय ?

ज्यावेळी दोन ग्रह किंवा चंद्र आणि ग्रह एकमेकांच्या जवळ येतात त्याला ‘युती’ म्हटले जाते. ते नेहमीपेक्षा जास्तच जवळ आलेलेअसतील त्यावेळी महायुती म्हटले जाते. गुरूचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग शनी पेक्षा जास्त असल्याने साधारण 20 वर्षांनी अशी एक वेळ येते कि गुरु शनीला पार करून पुढे जातो या पार करण्याच्या वेळी ते आपल्याला एकमेकांच्या जवळ आलेले दिसणार आहेत.

गुरू आणि शनीच्या महायुतीचे मनमोहक आकर्षक दृश्य पहाणचा अनुभव 12 इंचच्या परावर्तीत दुर्बिणीतून सोमवार दि.21 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 6 ते 7.30 दरम्यान मु. जे. महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या छतावर, जळगांव खगोलप्रेमी ग्रुप आणि मु. जे. महाविद्यालयातील भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने बघण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. खगोलप्रेमीनी या खगोलीय घटनांमागील विज्ञान समजून घ्यावे.सध्या कोरोना असल्याने कार्यक्रमाल येतांना शासनाने दिलेल्या नियमानुसार मास्क लावणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.
अमोघ जोशी, खगोल अभ्यासक