ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सकारात्मकतेने स्विकारा
जळगाव

ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सकारात्मकतेने स्विकारा

देशदूत लाईव्ह संवाद कट्ट्यावर उमटला सूर

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon

बदलत्या काळात शिक्षणाची तंत्रे बदलत असताना कोरोनाच्या या संकटकाळात ऑनलाईन शिक्षणासाठी आता शिक्षकांनीही अपडेट राहणे महत्वाचे आहे. यासाठी ऑनलाईन शिक्षणाकडे नकारात्मकतेने न बघता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बघणे गरजेचे आहे, असा सूर देशदूत लाईव्ह संवाद कट्ट्यावर बुधवारी उमटला.

‘ऑनलाईन शिक्षण आनंदी आनंद’ या विषयावर आयोजित लाईव्ह संवाद कट्ट्यात खान्देश एज्युकेशन सोसायटीचे समन्वयक चंद्रकांत भंडारी, कचरा वेचणार्‍या मुलांसाठी आनंदघर चालविणारे अद्वैत दंडवते, विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील सहभागी झाले होते.

सहभागी सर्वांना कार्यकारी संपादक अनिल पाटील यांनी ऑनलाईन शिक्षणावर बोलते केले. यावेळी चंद्रकांत भंडारी म्हणाले की, शाळांनी तांत्रिक कौशल्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिला पाहीजे. ऑनलाईन शिक्षणाचे महत्व वाढले आहे.

मात्र, सर्वच पालकांना ऑनलाईन अभ्यास घेता येतो का? हा देखील मोठा प्रश्न आहे. त्या सोबतच प्रत्येक घरातच शैक्षणिक वातावरण असते का? तंत्रज्ञान वाईट नसते, ते फक्त मदतीसाठी असते. सध्या लॉकडाऊनमुळे शिक्षण प्रणालीत मोठा बदल झाला आहे. हा बदल विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या पचनी पडतो आहे का? हे तपासून पाहणे देखील तितकेच महत्वाचे आहे. ऑनलाईन पद्धतीने दिलेला गृहपाठ किती विद्यार्थी करतात, शिक्षणात गृहकृत्य तोच गृहपाठ याला अधिक महत्व असते.

ऑनलाईन पद्धतीने शंकांचे निरसन करायला वेळ लागतो. समोर सर-मॅडम नाही म्हणून विद्यार्थ्यांचे लक्ष विचलीत होते. यातून कधी कधी एकटेपणा देखील येतो. या सर्व बाबी देखील विचारात घेतल्या जाणे गरजेचे आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे नवा वर्गवाद उभा राहण्याचा धोका देखील भंडारी यांनी व्यक्त केला.

अद्वैत दंडवते म्हणाले की, ई-लर्निंगचा विचार करताना शहरी भागातील उच्च व मध्यमवर्गीय यांचाच फक्त विचार होवू शकतो. ग्रामीण भागातील हलाखीचे आयुष्य जगणार्‍यांना दोन वेळेच्या भाकरीची भ्रांत असते. त्यामुळे त्याला शिक्षणाचे महत्व नसते. कोरोनाच्या या कठिण काळात ऑनलाईन शिक्षणासोबतच पालकांसोबत संवाद देखील गरजेचा आहे. शाळा केवळ शिक्षणाचे आदान प्रदान करण्याचे ठिकाण नाही.

प्रश्न फक्त शिक्षणापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत. कोरोनाच्या काळात शिक्षणासोबतच इतर सामाजिक प्रश्न मोठ्या प्रमाणात उभे ठाकले आहेत. या काळात ऑनलाईन शिक्षणासोबतच वाड्या-वस्ती पर्यंतच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण कसे पोहोचेल याच्या उपाययोजना होणे गरजेचे आहे. कोरोनाने सामाजिक संरचना बदलण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्या संधीकडे सकारात्मकतेने बघणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील म्हणाले की, अध्यापन, सराव, मुल्यमापन अशा प्रक्रियेतून शिक्षण प्रणाली जाते. अध्यापनासाठी ऑनलाईन प्रणाली सध्या उपलब्ध आहे. आम्ही देखील आमच्या शाळेत यापूर्वीच ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता विचारात घेता आम्ही त्यांना ऑनलाईन पद्धतीने कृती पाठवितो आणि गुगल फॉर्मच्या माध्यमातून त्याचे मूल्यमापनही करतो.

ऑनलाईन अभ्यासक्रमाला पालकांचाही चांगला पाठींबा मिळत आहे. फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे हाच शिक्षणाचा उद्देश नाही. एखाद्याने शिक्षणासाठी आत्महत्या करावी हे शिक्षणाचेच अपयश असल्याचे ते म्हणाले. शिक्षकांनी स्वत:ला सध्याच्या काळात अपडेट ठेवणे गरजेचे आहे, शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन्ही कोणत्याही माध्यमातून कनेक्ट असावे. पुस्तकी शिक्षणापेक्षा जीवनशिक्षण अधिक गरजेचे झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या या कठिण काळात शिक्षणासाठी सामाजिक दायित्व म्हणून समाजाने देखील पुढे आले पाहीजे आाणि पालक आणि विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाईन शिक्षणाला सकारात्मक पद्धतीने स्विकारले पाहीजे असे प्रतिपादनही त्यांनी केले.

Deshdoot
www.deshdoot.com