फुले मार्केट हॉकर्समुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले

पोलीस अन् मनपा करणार संयुक्त कारवाई : पार्किंगची व्यवस्था विचाराधीन
फुले मार्केट हॉकर्समुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील फुले मार्केट येथे उघड्यावर बसून व्यवसाय करणार्‍या हॉकर्स हे गर्दीला कारणीभूत ठरत असून महापालिकेतर्फे संबंधित हॉकर्सवर कारवाई करण्यात येत आहे.

दुसरीकडे याच कारणामुळे नागरिकांसह वाहनांची गर्दी होवून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने या पार्श्वभूमिवर आज शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्यासह महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी महापालिकेत पाहणी केली. महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आगामी काळात फुले मार्केट हॉकर्समुक्त करण्याची मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिली.

लॉकडाऊन उघडल्यानंतर दोन दिवसांपासून फुले मार्केटसह इतर मार्केटमध्ये हॉकर्सधारकांनी मोठी गर्दी केली आहे. महापालिकेतर्फे पोलीस बंदोबस्तात नियमित हॉकर्सवर साहित्य जप्त करण्यास कारवाई केली जात आहे. असे असतांनाही हॉकर्स प्रशासनाला जुमानत नसल्याचे चित्र आहे.

हॉकर्समुळे नागरिकांची गर्दी होवून वाहतुकीची कोंडीसह विविध समस्या निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमिवर आज शुक्रवारी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे व मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी फुले मार्केटमध्ये पाहणी केली. यावेळी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे हे उपस्थित होते.

फुले मार्केटमध्ये उपलब्ध असणार्‍या जागेवर मार्केटमध्ये येणार्‍या नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करणे याची पाहणी करण्यात आली. मार्केटमध्ये पार्किंगची व्यवस्था केल्याने रस्त्यावर वाहतुकीचा व गर्दीचा प्रश्न निर्माण होणार नाही.

यातून करोना काळात वाहतुकीचा प्रश्न, नागरिकांची सोय या सर्व गोष्टी पार्किंगद्वारे साध्य होणार आहेत. तसेच लवकरच महापालिका व पोलीस प्रशासनातर्फे हॉकर्समुक्त मोहिम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी बोलतांना डॉ. प्रविण मुंढे यांनी सांगितले. यावेळी नो पार्किन झोनमध्ये उभ्या असणार्‍या दुचाकी देखील जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com