जळगावात व्यापार्‍यांसह १५० हॉकर्सवर कारवाई

नियमांचे उल्लंघन ; दहा हजार रुपये दंड वसूल; जवळपास १०० हातगाड्या जप्त
जळगावात व्यापार्‍यांसह १५० हॉकर्सवर कारवाई

जळगाव - Jalgaon :

करोनाच्या पार्श्‍वभूमिवर लावण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, हॉकर्ससह व्यापार्‍यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

त्यामुळे मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे गुरुवारी व्यापार्‍यांसह १५० हॉकर्सवर कारवाई करुन दहा हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच जवळपास १०० हातगाड्यांसह साहित्य जप्त केल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.

कोरोना संसर्गामुळे मास्क, सॅनिटायझर तसेच दुकानांमध्ये काऊंटरवर पारदर्शक पडदा लावावा. अशा सूचना देण्यात आलेल्या आहे. मात्र गुरुवारी बाजारपेठेत पाहणी केली असता, बहुतांश दुकानांमध्ये नियमांचे पालन होतांना दिसून आले नाही. त्यामुळे संबंधीत व्यावसायिकांना सूचना दिल्या आहेत. दुकानदारांनी प्लॅस्टीकचा पारदर्शक पडदा न लावल्यास शुक्रवारपासून संबंधीत व्यावसायिकांचे दुकान सील करण्यात येईल.

संतोष वाहुळे,उपायुक्त मनपा

निर्बंधात शिथिलता दिल्यामुळे सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत व्यापार करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र गर्दी लक्षात घेता, पुन्हा करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

त्या पार्श्‍वभूमिवर बुधवारी महानगरपालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त,उपायुक्तांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून सूचना दिल्या. परंतू, दुसर्‍या दिवशी बाजारपेठेत पुन्हा जैसे-थे परिस्थिती दिसून आली.

त्यामुळे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विठ्ठल ससे, यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, यावेळी हॉकर्स, व्यावसायिक आणि पथक यांच्यात वाद झाला होता.

हॉकर्सचे साहित्य जप्त

फुले मार्केट, बळीरामपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड या ठिकाणी हॉकर्सला व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. हॉकर्समुळे मोठी गर्दी होत असून, वाहतूकीलादेखील अडथळा निर्माण होत असल्याने गुरुवारी जवळपास १०० हातगाड्यांसह साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेले साहित्य यापुढे परत मिळणार नसल्याची माहिती उपायुक्त वाहुळे यांनी दिली.

दुकानांमध्येही गर्दी

करोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. मात्र अनेक दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक ग्राहकांची गर्दी दिसून आली. तसेच कुठल्याही नियमांचे पालन होत नसल्याने व्यापार्‍यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com