जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राज्यात अभद्र युती झाली आहे. याच संस्कारातून जळगाव महापालिकेत अभद्र युतीचा महापौर झाल्याची टीका आमदार राजूमामा भोळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

सत्तांतरामागे बोलविता धनी दुसरा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, बंडखोर नगरसेवकांविरुध्द न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले.

जळगाव महानगर पालिकेत गेल्या काही दिवसांपासून सर्व घडामोडी झाल्या आहेत. भाजपचे 57 नगरसेवक असतांना अभद्र युतीचा महापौर झाला आहे.

जळगावची जनता कालही आमच्यासोबत होती, आजही आमच्यासोबतच आहे. जनतेने भाजपला आशिर्वाद दिले आहे.

पक्षातून फुटून गेलेले नगरसेवक विकासाच्या गप्पा मारत आहेत. मात्र अडीच वर्षात त्यांच्याच प्रभागात विकासकामांसाठी निधी दिल्याचेही आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले.

आमदार म्हणून माझ्यावर किंवा गिरीश महाजन यांच्यावर लक्ष दिले नाही म्हणून, आरोप करीत आहेत. परंतू आजपर्यंत आम्ही त्यांना सोबत घेवून काम करण्याची आमची भूमिका राहिली आहे. आम्ही भेदभाव कधीही केलेला नाही.

आम्ही जनतेचे सेवक आहोत. सत्तेला सेवेचे साधन समजणारा भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे सर्व समाजाला आतापर्यंत स्थान दिलेले आहे.

भाजपच्या वसंतस्मृति कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत बालाणी, कैलास सोनवणे, अॅड. शुचिता हाडा, डॉ.अश्विन सोनवणे, सुरेश सोनवणे, डॉ.राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी, दीपक साखरे उपस्थित होते.

अमृतच्या कामांमुळे रस्त्यांच्या कामांना स्थगिती

जळगाव शहरात अमृतअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे आणि मलनिःसारण योजनेचे काम सुरु आहे. ही कामे पुर्ण झाल्यानंतरच रस्त्यांची कामे करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत.

त्यामुळे रस्त्यांची कामे रखडली आहे. परंतू शहरातील रस्त्यांसाठी 70 कोटींची कामे करण्याचा ठराव महासभेत करण्यात आला आहे.

याबरोबरच गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेवर हुडकोचे कर्ज होते. जवळपास साडेचारशे कोटीमधून अडीचशे कोटी कर्ज तत्कालीन आमच्या सरकारने माफ केलेले आहे. जेडीसीसी बँकेचे कर्ज देखील ‘नील’ केले असल्याचेही राजूमामा भोळे यांनी सांगितले.

आमची बांधिलकी जनतेची आहे, विकासाशी आहे. 100 कोटी निधीतून 42 कोटींच्या निधीला स्थगिती कोणत्या सरकारने दिली असा सवालदेखील आमदार राजूमामा भोळे यांनी उपस्थित केला.

स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एका महापालिकेकडे लक्ष घालत आहेत. याचा अर्थ काय? असा प्रश्न उपस्थित करुन आमदार भोळे यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला.