
जळगाव | प्रतिनिधी Jalgaon
तालुक्यातील मोहाडी येथील तरुण तलावाची साफसफाई करीत असताना त्याच्या पायात अंडरग्राउंड इलेक्ट्रीक वायर अडकल्याने त्याचा पाण्यात बुडून रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
मोहाडी येथील शंकर तुकाराम सपकाळे (वय ३२) हा तरुण एका तलावात साफसफाईचे काम करीत होता. या तलावातून अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक वायर गेली आहे. ही वायर तरुणाच्या पायात अडकली.
या तरुणाला पोहता येत होते. मात्र, पायातून वायर न निघाल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार नजीकच्या इतरांच्या लक्षात आला. त्यांनी तरुणाला पाण्यातून बाहेर काढले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन जाधव यांनी जाहीर केले.
या घटनेबाबत कळताच नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात धाव घेतली. शंकर तुकाराम सपकाळे याचा मृतदेह बघताच नातेवाईकांनी आक्रोश केला. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, दोन भाऊ, पत्नी, मुलगा असा परीवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.