कोविड रुग्णालयात दाखल आईच्या रक्ताचे नमुने परस्पर घेणार्‍या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव

कोविड रुग्णालयात दाखल आईच्या रक्ताचे नमुने परस्पर घेणार्‍या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

थेट आयसीयूमध्ये प्रवेश; अधिकारी, कर्मचार्‍यांशी घातली हुज्जत

Balvant Gaikwad

जळगाव - शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहीत केलेल्या गणपती हॉस्पिटलमधील थेट आयसीयूमध्ये प्रवेश करुन दाखल रुग्ण आईच्या रक्ताचे परस्पर नमुने घेवून अधिकारी, कर्मचार्‍यांशी ३० रोजी दुपारी १२.३० वाजता मुलाने हुज्जत घातली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गणपती हॉस्पिटलमध्ये ६९ वर्षीय महिला २६ जूनपासून कोरोनावरील उपचार घेण्यासाठी दाखल आहे. त्यांच्या मुलास बाहेरील एका डॉक्टरने रक्त तपासणी करण्यास सांगितले. त्यामुळे हा मुलगा आईच्या रक्ताची तपासणीची मागणी करीत होता.

परंतु, हे शासकीय रुग्णालय आहे. येथील रुग्णांच्या रुक्ताचे नमुने बाहेरील खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी खासगी व्यक्तीमार्फत देता येत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत त्या मुलाने अधिकारी, कर्मचार्‍यांशी वाद घातला.

समज देवून देखील त्याने पॉझिटिव्ह रुग्णांसाठीच्या आयसीयूमध्ये कोणतेही पीपीई किट न परिधान करता विनापरवानगी प्रवेश केला. त्या मुलाने रुग्णाच्या हातामधून इंजेक्शनने परस्पर रक्ताचे नमुने घेतले आणि तो तेथून निघून गेला.

या वेेळी त्याने डॉक्टर, पोलीस व इतर कर्मचार्‍यांशी हुज्जत घातली. या प्रकारामुळे शासकीय आदेशाचे उल्लंघन करुन सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com