८३६ जि प शिक्षक बदलीच्या वाटेवर
जळगाव

८३६ जि प शिक्षक बदलीच्या वाटेवर

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेमध्ये सध्या बदल्यांचे वारे वाहत असून सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा आदी विविध विभागांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आता जळगाव जिल्ह्यात 836 जिल्हा परिषद शिक्षक बदलीच्या वाटेवर आहेत. येत्या 5 ऑगस्टपासून ऑफलाइन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने शिक्षकांच्या बदल्या करण्यात येऊ नये, यासाठी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी बदल्या रद्द करण्यासाठी मैदानात उतरुन दंड थोपटले. मात्र, शिक्षक संघटनांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवून त्यांचे बंड शमविले. शिक्षण विभागाने शासनाच्या निर्देशानुसार शिक्षकांच्या बदल्याची माहिती जिल्ह्याभरातून संकलित करुन अंतीम यादी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी अंतीम यादी जिल्हा परिषदेच्या आवारात लावण्यात आली आहे.

ग्रेडेड मुख्याध्यापकांपासून सुरुवात

जळगाव जिल्ह्यात शिक्षकांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. प्रशासकीय व विनंती बदली याद्यांची छाननी करण्यात आली असून अंतीम यादीत जिल्ह्याभरातून 836 शिक्षक बदली पात्र ठरले आहेत. दि.5 ते 9 ऑगस्ट दरम्यान शिक्षक बदल्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात 5 ऑगस्टपासून सकाळी 10 ते 6 वाजेदरम्यान ऑफलाइन बदली प्रक्रिया राबविण्यात येईल. सुरुवातीला ग्रेडेड मुख्याध्यापक यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर पदवीधर शिक्षक, उपशिक्षक अशी बदली रचनेच्या क्रमानुसार बोलावण्यात येणार आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एस.अकलाडे यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या ऑफलाईन बदली प्रक्रिया समुपदेशनाने वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे. त्यानुसार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजता ग्रेडेड मुख्याध्यापक (मराठी, उर्दू माध्यम) विशेष संवर्ग शिक्षक भाग-1, विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 असे 47 तर पदविधर शिक्षक उर्दू माध्यम विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 व 2 मधून 43 शिक्षक, दि. 6 रोजी पदविधर शिक्षक (मराठी माध्यम), विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 व 2 नुसार 80 तर उर्दू माध्यम उपशिक्षक 100, 7 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेदरम्यान उपशिक्षक मराठी माध्यम 81 तर दुपारी 2 ते सांयकळी 7 वाजेदरम्यान 76 शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com