जिल्ह्यात आढळले डेल्टा प्लसचे 7 रुग्ण

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची माहिती
जिल्ह्यात आढळले डेल्टा प्लसचे 7 रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात डेल्टा प्लस कोविड विषाणूची लक्षणे असलेले सात रुग्ण आढळून आले आहेत. हे सातही रुग्ण ठणठणीत असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी घाबरुन न जाता खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

राज्यात डेल्टा प्लस कोविड विषाणूची लक्षणे असलेले 21 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 7 रुग्ण हे जळगाव जिल्ह्यातील आहेत. याबाबत नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होवू नये यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले की, कोरोनाच्या विविध तपासण्यांसाठी जिल्ह्यातून दरमहा 100 नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. ज्या सात रुग्णांमध्ये या विषाणूची लक्षणे आढळली आहेत ते सर्व ग्रामीण भागातील असून सर्व रुग्ण हे एकाच क्षेत्रातील आहे. त्यांचे नमुने मे 2021 मध्ये घेण्यात आले होते.

ते करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते मात्र या सर्व रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. तसेच त्यांचे कोरोना लसीकरणही झालेले नव्हते. त्याचबरोबर त्यांना कोणत्याही रुग्णालयात दाखल न करता ते बरे झाले असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने या सातही रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींची तपासणी केली असून शिवाय ते ज्या भागात राहतात तेथील नागरीकांचीही तपासणी केली आहे. या क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर हा 1.21 टक्के इतकाच म्हणजेच जिल्ह्याच्या सर्वसाधारण दरा इतकाच आढळून आला असून त्यात कोणतीही वाढ दिसून आलेली नाही.

त्यामुळे नागरीकांनी भिती बाळगण्याचे कारण नसले तरी कोरोना हा आजारच घातक असल्याने प्रत्येक नागरीकाने कोरोनाच्या त्रीसुत्रीचेपालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

लक्षणे असल्यास तात्काळ चाचणी आवश्यक

जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संशयितांच्या तपासण्याची संख्या वाढविण्यात येत असून ज्याही नागरीकांना कोरोनाची लक्षणे जाणवतील त्यांनी तातडीने आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी व कोरोनापासून बचाव करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com