जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जामनेरच्या जि. प. मालकीवर बीओटी तत्वावर बांधलेल्या शॉपिंग कॉम्पलेक्सच्या कामात 200 कोटींचा घोटाळा झाला आहे.

या जागेचा जि.प.ला प्रिमियम न भरता बांधकाम करुन घेण्यात आले आहे. तसेच नियोजीत शाळेच्या जागेवर देखील विकासकाने कॉम्पलेक्स उभारुन मोठा गैरव्यवहार केला आहे.

यात खटोड बंधुंसह तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आ. गिरीश महाजन यांचा सहभाग असलयाचा खळबळजनक आरोप अॅड. विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

जामनेर येथील जि.प.मालकीचे भुखंड गट क्रं. 263, 264,265,266,267,269,270,413,433,447,451 वर बीओटी तत्वावर मराठी शाळा, उर्दु शाळा, पंचायत समिती कार्यालय इमारत बांधकाम करणे व उर्वरित जागेवर कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता.

हा प्रस्ताव शासनाने दि.25 जुलै 2011 रोजी मंजुर केला असून संबधित विकासकाने प्रकल्प सुरु करण्यापुर्वी निविदेत मान्य केलेली प्रिमिअमची रक्कम जिल्हा परिषदेस अदा करणे बंधनकारक राहिल असे स्पष्ट नमुद केले होते.

त्यानुसार विकासकाने जि.प.ला 6 कोटी 98 लाख 35 हजार रुपये भरणे आवश्यक होते. परंतु विकासक श्रीराम खटोड, श्रीकांत खटोड व रामसहाय शर्मा यांनी बांधकाम पुर्ण केल्यानंतरही जिल्हा परिषदेस एक रुपयाही भरलेला नाही, तसेच विकासकाने मंजुर प्रस्तावानुसार नियोजित शाळा त्या ठिकाणी न बांधता त्या जागेचा वापर कोणतीही परवानगी न घेता कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी केला असून सदर शाळा ही नियोजित जागेपासून दोन किलोमीटर अंतरावर एका खासगी जागेत बांधण्यात आली असल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले.

तात्काळ दखल घेत तीन सदस्यीय समिती गठीत

हे सर्व प्रकार घडल्यानंतर देखील जि.प.प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याची तक्रार अॅड. विजय पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे 30 मार्च रोजी केली होती. या तक्रारीची राज्यशासनाने तत्काळ दखल घेत तीन सदस्यांची समिती गठीत करुन समितीला दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आ.महाजनांकडे बेकायदेशीर मालमत्ता

आ. गिरीश महाजन यांची मालमत्ता बघता त्यांच्याकडे 3 कोटी रुपयांपर्यंत हवी होती. परंतु त्यांची मालमत्ता ही 10 कोटींपेक्षा अधिक आहे. तर काही महिलांना त्यांनी मोठ-मोठ्या शहरात फ्लॅट घेवून दिले असल्याचा धक्कादायक आरोप अॅड. पाटील यांनी केला.

...तर घोटाळ्यात फडणवीसांचाही सहभाग

जि. प.ला 7 कोटी रुपये भरुन जामनेरच्या मार्केट परिसरातील जागेच्या विकासाचा प्रसताव होता. परंतु खंडोट बंधूनी ती दुकानांची विक्री देखील केली. या सर्व व्यवहारातून 200 कोटींचा गैरव्यवहार आ. महाजन यांनी खटोड बंधूंच्या माध्यमातून केला आहे. तसेच त्याच इमारतीमध्ये हॉस्पीटल सुरु केले असून त्याचे उद्घाटन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले आहे. त्यामुळे त्यांचा देखील यात सहभाग असल्याचे अॅड. विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठराव करणारे जि.प.सदस्य येणार अडचणीत

मंजूर केलेल्या शाळेच्या जागेत विकासक श्रीकांत खटोड, श्रीराम खटोड व रामसहाय शर्मा यांनी परस्पर बदल केला. ज्याठिकाणी शाळा बांधली आहे ती जागा देखील स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. हे सर्व प्रकरण अंगलट येवू नये म्हणून बोदवड रस्त्यापासून तीनशे मीटर अंतरावरील गट क्र.451 मध्ये उर्दु शाळा बांधण्यात यावी, असे मुस्लिम पंच कमिटीचे पत्र त्यांनी जि.प.ला सादर केले व जि.प.सदस्यांकडून गट क्र. 451 मध्ये शाळा बांधण्याचा ठराव मंजुर करुन घेण्यात आला मात्र, शासनाच्या आदेशाने कॉम्प्लेक्सच्या जागी शाळा नियोजित असतांना जि.प.सदस्यांनी केलेला ठराव शासन आदेशा विरोधात असल्याने ठराव करणारे सर्व जि.प.सदस्य हे जळगाव मनपातील घरकुल प्रमाणे अडकणार असल्याचे सुतोवाच अॅड. पाटील यांनी केले.