जिल्हा परिषदेत 18 ओबीसी उमेदवारांना बसणार फटका

आरक्षण रद्दमुळे दिग्गजांना शोधावा लागणार नवीन गट
जिल्हा परिषदेत 18 ओबीसी उमेदवारांना बसणार फटका
Jalgaon ZP

जळगाव jalgaon- लालचंद अहिरे

राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Local body elections) कार्यकाळ येत्या चार ते पाच महिन्यांनी संपणार आहे. त्यात जळगाव जिल्हा परिषदेचा (Jalgaon Zilla Parishad) देखील समावेश राहणार आहे. सध्या ओबीसींना आरक्षण (Reservation to OBCs) मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, अशी सर्वपक्षीय मागणी होत आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाविना निवडणुकांना स्थगिती (Postponement) देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर आणि पालघर जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणविना निवडणुका होणार आहे. ओबीसी आरक्षण रद्दमुळे अनेक मातब्बर उमेदवारांना त्याचा फटका बसणार आहे.

जळगाव जिल्हा परिषदेमध्येही 18 जागांवरील ओबीसी उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांना या जागेला मुकावे लागण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

सध्यास्थितीत जळगाव जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्या 67 असून त्यात भाजपा-33, राष्ट्रवादी काँग्रेस-16, शिवसेना-14, काँग्रेस-4 असे पक्षीय बलाबल आहे. जि.प.च्या विद्यमान पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपण्यास चार ते पाच महिन्यांचा कालावधी उरलेला असल्याने त्याचत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. जळगाव जिल्ह्यातील 18 गटातून ओबीसी उमेदवार निवडून आलेले आहेत.

त्यात ना.मा.प्र.स्त्री वर्गातून वर्डी-गोरगावले बु!!, येथून ज्योती राकेश पाटील,पाल-केर्‍हाळागटातून नंदा अमोल पाटील,ऐनपूर-खिरवड गटातून रंजना प्रल्हाद पाटील, चिनावल-खिरोदा प्र.या.गटातून सुरेखा नरेंद्र पाटील, साकेगाव- कंडारी गटातून रवींद्र नाना पाटील, साळवा-बांभोरी बु.गटातून माधुरी चंद्रशेखर अत्तरदे, सोनवद बु.-पिंप्री खु.गटातून गोपाल घनश्याम चौधरी,पाळधी बु.-बांभोरी गटातून प्रतापराव गुलाबराव पाटील, पांतोडा-दहिवद गटातून मीना रमेश पाटील, शेळावे बु.-म्हसवे गटातून हिमत वामन पाटील, मंगरुळ- शिरसमणी गटातून डॉ. हर्षल मनोहर माने, देवगाव- तामसवाडी गटातून रोहन सतीश पाटील, शहापूर-देऊळगाव गटातून कल्पना राजेश पाटील, पाळधी-लोंढ्री बु.गटातून प्रमिला राघव पाटील, नगरदेवळा-बाळद बु.गटातून मनोहर गिरधर पाटील, सायगाव-उंबरखेड गटातील भूषण काशिनाथ पाटील, वाघळी-पातोंडा गटातील पोपट एकनाथ भोळे, रांजणगाव-पिंपरखेड गटातील सुनंदा सीताराम चव्हाण हे उमेदवार प्रतिनिधीत्व करीत आहेत. मात्र, ओबीसीचे आरक्षण रद्दमुळे या गटातील उमेदवारांना दुसर्‍या गटात जागा शोधावी लागणार आहे.

मातब्बरांनी घेतली धास्ती

जिल्हा परिषदेचा कार्यकाळ चार ते पाच महिन्यांनी संपल्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाकडून इतर आरक्षणाची अधिसूची जाहीर होईल. मात्र, ओबीसी आरक्षण रद्दमुळे या जागेवरील उमेदवारांना नवीन गटातून उमेदवारी शोधावी लागणार आहे. तर काहींना सोयीच्या गटासाठी धडपड करावी लागणार आहे. ओबीसीच्या जागेवर इतर जनरल उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी उमेदवारांची संख्या घटणार असल्याने गट बदलाच्या धास्तीने मातब्बरांनी धसका घेतला आहे.

सध्याची जिल्हा परिषदेतील आरक्षण स्थिती

अनुसूचित जाती- 06, अनुसूचित जमाती- 12 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-18 अशी आरक्षणाची स्थिती आहे. स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवण्याच्या जागा धरुन) राखून ठेवावयाच्या एकूण जागा 34 असून अनुसूचित जाती- 03, अनुसूचित जमाती- 06 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-09 आहेत. तर सर्वसाधारण स्त्रियांसाठी 16 जागा राखीव आहेत. आता ओबीसींच्या आरक्षण रद्दमुळे या जागांवरील उमेदवारांना पाणी सोडावे लागणार आहे.

सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाला फटका

सध्या जिल्हा परिषदेत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या गटातून भाजपचे -5, राष्ट्रवादी काँग्रेस-7, काँग्रेस-1, आणि शिवसेना-4 असे 18 उमेदवार जिल्हा परिषदेत नेतृत्व करीत आहेत. यात सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि त्या खालोखाल शिवसेना व काँग्रेस पक्षातील उमेदवारांना फटका बसणार आहे.

जि.प. अध्यक्षांसह आजीमाजी सभापतींनाही बसणार फटका

ना.मा.प्र.स्त्री राखीव ऐनपूर-खिरवड गटातून भाजपच्या रंजना प्रल्हाद पाटील या निवडून आलेल्या आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. वर्डी-गोरगावले बु!!, गटातून ज्योती राकेश पाटील या निवडून आलेल्या असून त्यांच्याकडे जि.प.महिला व बालकल्याण सभापतीचा भार आहे.

वाघळी-पातोंडा गटातील पोपट एकनाथ भोळे हे माजी सभापती आहेत. नगरदेवळा-बाळद बु.गटातील मनोहर उर्फ रावसाहेब पाटील हे शिवसेनेचे गटनेते तर मंगरुळ- शिरसमणी गटाचे सदस्य डॉ. हर्षल मनोहर माने हे शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत.

तर साकेगाव- कंडारी गटातील रवींद्र नाना पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपगटनेते आहेत. यासह इतर उमेदवारांना आपल्या गटाला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com