जळगाव - Jalgaon

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटमध्ये गाळेधारकांकडून थकबाकीची वसुली करण्यासाठी मनपा प्रशासन दबाव तंत्राचा वापर करीत आहे. वारंवार प्रशासनाला विनंती करुनही सीलची कारवाई केली जात आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात शहरातील अव्यावसायिक असलेले १६ मार्केट उद्या दि. २६ पासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मनपा मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी दिली.

मनपा प्रशासनातर्फे तीन दिवसांपुर्वी महात्मा गांधी मार्केटमधील एक गाळा सील करण्यात आला आहे. कारवाई करुन मनपा प्रशासनाकडू दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. या पार्श्वभूमिवर मनपा मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत दि. २६ पासून १६ मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला माजी नगराध्यक्ष बंडू काळे, राजस कोतवाल, संजय पाटील, युवराज वाघ, तेजस देपूरा, पंकज मोमाया, वसीम काझी, सुरेश पाटील, विलास सांगोरे, रिझवान जहॉंगिरदार, प्रकाश गगडाणी, रमेश तलरेजा, सुजीत किनगे, शैलेंद्र वानखेडकर, हेमंत परदेशी, शिरीष थोरात अमोल वाणी, अमित गौड उपस्थित होते.

व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

महानगरपालिकेने थकबाकीपोटी अवाजवी बीले दिली आहेत. आधीच कारोनाच्या संसर्गामुळे व्यापार ठप्प झालेला आहे. त्यात अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारक गरीब आहेत. अशा स्थितीत प्रशासनाने दिलेले अवाजवी बील कुठून भरणार असा प्रश्न डॉ.सोनवणे यांनी उपस्थित केला. गोरगरीब गाळेधारकांवर उपासमारीची वेळ आली असुन, प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा

मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. त्यांनी नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन आणि बैठक लावून त्यावर मार्ग काढण्याबाबत पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाई करु नये अशी विनंतीही करण्यात आली आहे. तरीदेखील गाळे सीलच्या कारवाईच्या माध्यमातून गाळेधारकांना प्रशासन त्रास देत असल्याचेही डॉ.सोनवणे म्हणाले.