वरणगाव, ता. भुसावळ, (प्रतिनिधी) bhusawal

भारतातील अत्यंत कठीण मानल्या गेलेल्या हिमालयातील पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात स्थित संदकफू शिखरावर जिल्ह्यातील १० साहसी तरुणांनी अवघ्या पाच दिवसात चढाई केली. याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

पश्चिम बंगालमधील दार्जींलिंग जिल्ह्यात असलेले संदकफू हे शिखर सिंगलिला रेंजमधील १२ हजार फूट उंचीवर असलेले सर्वांत उंच शिखर असुन नेपाळ सिमेच्या अगदी जवळ आहे. संदकफू शिखर गाठून जगातील पाच सर्वोच्च शिखरांपैकी माउंट एव्हरेस्ट, कांचनजंगा, लाहोत्से व मकालू असे चार शिखर येथुन दिसतात. युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडीया या संस्थेने डिसेंबर- जानेवारी महिन्यात गिर्यारोहकांसाठी संदकफू शिखर सर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात जिल्ह्यातील १० तरुणांनी सहभाग नोंदविला होता. अवघ्या पाच दिवसांत त्यांनी ५४ किलोमीटर चढाई करीत हे शिखर गाठले.

ताशी ७० ते ८० किमी वेगाने वाहणारे थंड वारे, तापमान कमाल एक ते किमान उणे आठ अंश, सभोवताली हाडे गोठवणारी थंडी, प्राणवायुची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे शिखर सर केले. याची सुरुवात पश्चिम बंगालमधील दार्जींलिंग येथील बेस कॅम्पवरुन झाली. ट्रॅकला सुरुवात करण्यापुर्वी दार्जींलिंग हा ६ हजार ७०० फुटांवरचा बेस कॅम्प, पुढे धोे ८ हजार ५०० फुट), तुंबलिंग १० हजार फुट, कालापोखरी १० हजार १९६, संदकफू १२ हजार फुट, श्रीखोला ७ हजार ४९८फुट असे कॅम्प होते. कालापोखरी ते श्रीखोला दरम्यान संदकफू हे बारा हजार फुटांवरील सिंगलीला रेंजमधील सर्वांत उंच शिखर आहे. चढाईसाठी अत्यंत अवघड व धोकादायक मानले जाते. या शिखराचा रस्ता मणिबंजन पासुन सुरु होतो. सुमारे ५४ किमी लांबीचा रस्ता खुपच सुंदर आहे. येथील हिमालयातील कोब्रा लिलींच्या विपुलतेमुळे संदकफूला विषारी वनस्पतींचा पर्वत म्हणून ओळखले जाते. हा एक कठिण ट्रॅक असल्याने गिर्यारोहकांना येथे जाण्यापुर्वी शरीराच्या तंदुरुस्तीची खुप काळजी घेतली जाते. अशा या अत्यंत कठीण शिखर सर केल्याचा आनंद गिर्यारोहक रोमिंग राजपुत (भुसावळ), अनिल महाजन (वरणगाव फॅक्टरी), डॉ. राहूल भोईटे (वरणगाव), डॉ. रविंद्र माळी (वरणगाव), दिनेश पाटील (खिर्डी बुद्रूक), श्रीकांत माळी (वरणगाव), प्रशांत पाटील (तांदलवाडी), अजय चाळसे (वरणगाव), प्रदीप वराडे (जळगाव), समाधान महाजन (विखरण) या सर्वांच्या चेहर्यावर दिसून येतो.

भारत आणि नेपाळच्या सीमेवरील हिमालयाच्या पर्वत रांगांत गिर्यारोहण करण्याचा अनुभव फार वेगळा आणि विशेष आहे. ‘द बेस्ट व्ह्यू कम्स आफ्टर द हार्डेसट क्लाईंब’ या उक्तीचा प्रत्यय संदकफू ट्रॅकदरम्यान वारंवार येतो.

-अनिल महाजन,

गिर्यारोहक वरणगांव फॅक्टरी