साक्री तालुक्याला बेमोसमी पावसाने झोडपले

मका, कांदा पिकाचेही नुकसान
साक्री तालुक्याला बेमोसमी पावसाने झोडपले

पिंपळनेर/वार्ताहर - Pimpalner

साक्री तालुक्यातील डांगशिरवाडे गाव परिसरात काल एक तास मुसळधार पाऊस झाला. या बरोबरच विरखेल, मडाणे, शेवगे, बल्हाने व कासारे परिसरातही जोरदार पाऊस झाला. यामुळे मका भिजला आहे. कांदा पिकाचेही नुकसान झाले आहे.

बेमोसमी पावसाने शेतकरी पुन्हा आसमानी संकटात सापडला आहे. संकटांची मालिका अखंडपणे सुरु आहे. बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठीकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

साक्री तालुक्यातील डांगशिरवाडे येथे एक तास जोरदार पाऊस तर कासारे, विरखेल, शेवगे, मंडाणे, परीसरात मुसळधार पाऊस तर पिंपळनेर व परिसरात सायंकाळी पाच वाजेपासुन जोरदार पाऊस झाला. उघड्यावर पडलेला मका, विटाभट्टि तसेच नव्याने लावलेल्या कांदापिकांचे रोपांचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. आंब्याचा मोहर गळुन पडू लागला असल्याने शेतकरी पुन्हा आस्मानी संकटात सापडला आहे.

काल सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाटात जोरदार पाऊस झाला. पिंपळनेर, बल्हाणे,डांगशिरवाडे,सामोडे, चिकसे,देशशिरवाडे ,कासारे ,धाडणे,शेणपुर,मंडाणे, शेवगे,विरखेल, सह आदिवासी भागात ही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

निसर्ग साथ देत नाही आणि शासन सहकार्य करत नाही, अशा विचित्र परीस्थितीत शेतकऱ्यांनी कसं जगावं, त्याला पुन्हा उभं करायचं असेल तर शासनाने एक पाऊल पुढे टाकत मदतीचा हात पुढे केला पाहिजे याबरोबरच शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लोक क्रांती सेनेचे साक्री तालुक्याचे नेते सुभाष जगताप यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com