शेतकर्‍यांच्या खात्यावर 3.38 कोटींचा केळी फळपिक विमा जमा

शेतकर्‍यांच्या खात्यावर 3.38 कोटींचा केळी फळपिक विमा जमा

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने सुमारे 1025 शेतकरी बांधव यांना प्रत्येकी प्रति हेक्टर

33 हजार रुपये याप्रमाणे एकूण 3.38 कोटी रुपयांचा केळी फळपिक विमा मंजूर झाला असून शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा देखील झाली आहे. याबद्दल शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

माजी मंत्री अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आ. काशिराम पावरा यांनी सातत्याने पाठपुरावा करून पंतप्रधान विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा मिळवून देण्यासाठी तसेच तालुक्यातील शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी शासन दरबारी सतत निवेदने देऊन व पाठपुरावा करण्यासाठी तालुक्यातील अनेक पदाधिकारी, शेतकर्‍यांसोबत होते.

सातत्याने शासनाकडे, कृषी आयुक्तांकडे पाठपुरावा केल्याने रडार दुरुस्ती करण्यात आली. तसेच अपात्र ट्रीगर हे योग्य प्रकारे लक्ष घालून त्यात सुधारणा होऊन प्रत्यक्षात सापेक्ष नोंदी घेण्यात आल्याने ऊन, वारा, पाऊस आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ सदर ट्रीगर पात्र झाल्याने शेतकर्‍यांना मिळाला.

या व्यतिरिक्त अवकाळी पाऊस, गारपीटमुळे इतर अनेक पिकांचे नुकसान झाले होते. त्या सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना देखील नुकसान भरपाई मिळावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांनी केळी, डाळींब, पेरू, पपई आदी अनेक फळपिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती.

शेतकर्‍यांनी पंतप्रधान विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा उतरविला आहे. फळपिक, इतर पिक व मालमत्ता विमा धारकांचे वादळामुळे झालेल्या नुकसानीचे सामूहिक पंचनामे करून नुकसान भरपाई विमा दावा मिळावे यासाठी आ. काशिराम पावरा यांच्यासह असंख्य पदाधिकारी यांनी निवेदन दिले होते.

त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. यामुळे हजारो शेतकरी बांधवांनी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा व सर्व पदाधिकार्‍यांचे आभार मानले आहेत.

शेतकर्‍यांच्या खात्यावर विमा कंपनीतर्फे विमा रक्कम 3 कोटी 38 लाख 25 हजार रुपये जमा झाल्याचे तालुका कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. तसेच अजूनही लाभार्थी पात्र शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com