कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेली महिला कोसळली खोल दरीत

कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी 
आलेली महिला कोसळली खोल दरीत

धुळे - प्रतिनिधी Dhule

धुळे शहरातील गोपाळ नगरात राहणाऱ्या ललिता प्रफुल्ल चव्हाण (वय ३८) या महिलेचा लळींग किल्ल्याच्या शिखर भागावरून तोल गेल्याने मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ७ वाजेदरम्यान घडली. कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी त्या आल्या होत्या.

जि.प.च्या ग्रा. पं. विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले प्रफुल्ल चव्हाण हे पत्नी, मुलगा यांच्यासोबत सकाळी किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी किल्ल्याच्या शिखरावर असलेल्या मंदिराजवळ अचानकपणे तोल गेल्याने जवळपास ६० ते ७० फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला.

किल्ल्यावर काम करणाऱ्या लोकांना घटना लक्षात येताच त्यांनी गावाचे पोलीस पाटील यांना तात्काळ घटनेची माहिती दिली. स्थानिकांच्या मदतीने सदर महिलेच्या मृतदेहाची शोधाशोध करून तब्बल तीन तासात अथक परिश्रमाने महिलेचा मृतदेह किल्ल्याच्या पाठीमागच्या भागात खाली उतरवण्यात आला.

हिवाळ्याचे दिवस असल्याने फिरण्यासाठी अनेकजण सकाळी कुटुंबासह किल्ल्यावर येतात. चव्हाण हे देखील त्यापैकीच एक होते. ते सुद्धा आपली पत्नी आणि १२ वर्षीय मुलासोबत फिरण्यासाठी आले होते. मात्र, त्यांच्यावर असा प्रसंग ओढवला जाईल याची जरा देखील त्यांनी कल्पना केली नसेल. घटनेची माहिती मिळताच प्रफुल्ल चव्हाण यांच्या निकटवर्तीयांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत पाहिल्याने निकटवर्तीयांना अश्रू अनावर झालेत. किल्ल्याच्या पाठीमागचा भाग अत्यंत घसरडा व निमुळता असल्याने महिलेचा मृतदेह काढणे खूप कठीण जात होते. मात्र लळींग गावातील स्थानिकांसह, इरकॉन टोल कंपनीचे कर्मचारी, मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वनविभागाचे वनमजुर आदींच्या मदतीने अखेर मृतदेह किल्ल्याच्या मागील भागात खाली उतरून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हारुग्णालयात पाठविण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com