धुळे | प्रतिनिधी Dhule

मंत्रालयातून सेवानिवृत्ती घेतलेल्या मुळ नंदुरबार जिल्ह्यातील एका अधिकार्याने भ्रष्ट मार्गाने तब्बल ४२ लाखांची अपसंपदा जमविल्याचे उघड झाले आहे. यासाठी त्याला सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक असलेल्या पत्नीने देखील सहाय्य केल्याने गावीत दात्पत्याविरोधात शहर पोलिसात गुहा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान दोघे फरार असून एसीबीचे पथक त्यांच्या मागावर आहे. याबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सुनिल कुराडे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्रकुमार कृष्णराव गावीत (वय ५९ रा. प्लॉट नं. ५, प्रतापनगर, तळोदा जि.नंदुरबार) याने मंत्रालयात वर्ग २ पदावर कक्ष अधिकारी म्हणून काम करतांना १ जानेवारी २००५ ते ३१ डिसेंबर २०१३ या काळात २ कोटी ४३ लाख ८१ हजार ४६१ रुपयांचे उत्पन्न संपादीत केले.

या कालावधीत त्याने १ कोटी ६ लाख ९५ हजार ५८२ रुपये खर्च देखील केले. लोकसेवक असलेल्या राजेंद्रकुमार गावीतने एकूण १ कोटी ७९ लाख ३५ हजार २१९ रुपयांची मालमत्ता संपादीत केली. त्याच्याकडे असलेली मालमत्ता त्याच्या ज्ञात उत्पन्नाशी विसंगत आहे.

राजेंद्रकुमार यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा ४२ लाख ४९ हजार ३४० रुपये म्हणजेच १७.४२ टक्के अपसंपदा धारण केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्याची पत्नी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक सौ. ईला राजेंद्रकुमार गावीत यांनी ही अपसंपदा स्वतःच्या नावे धारण करून राजेंद्रकुमार गावीत यांना अपसंपदा धारण करण्यास सहाय्य केले.

त्यानुसार या गावीत दाम्प्त्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९९८,संशोधन , २०१८ चे कलम १३ (१)(अ) १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.