दगडी तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू

दगडी तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

बकरी ईदच्या दुसर्‍याच दिवशी शहरातील दिलदार नगरातील मुस्लीम कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. आज दुपारी लळींग गावाजवळील दगडी नाला तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.

सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस प्रशासनाने पट्टीच्या पोहणार्‍यांच्या माध्यमातून शोध मोहिम राबवून दोन्ही युवकाचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. घटनेमुळे दिलदार नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

मोहम्मद आकिफ मोहम्मद आरीफ (वय 16) व अरबाज खान मुसा खान (वय 17) रा. दिलदार नगर, गल्ली नं. 11, धुळे अशी दोघा मयत युवकांची नावे आहेत. ईदनिमित्त वरील दोघांसह मोहम्मद फइम मोहम्मद कासीम, शकील अन्सारी असे दोघे मित्र ईदनिमित्त आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुंबई- आग्रा महामार्गावरील लळींग- तिखी रस्त्यावरील दगडी नाला तलाव परिसरात फिरायला गेले होते. तेथे चौघेही पोहण्यासाठी पाण्यात उतरले.

परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांपैकी मोहम्मद आकिफ मोहम्मद आरीफ व अरबाज खान मुसा खान हे खोल पाण्यात बुडाले. दोघो मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पाण्यात बेपत्ता झाले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली. तसेच घरीही कळविले. त्यानंतर स्थानिक नागरिक मदतीला धावुन आले. तसेच घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक संगिता राऊत, पोकाँ सचिन वाघ, पोकाँ गणेश दुसाने व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ परिसरातील पट्टीच्या पोहणार्‍यांना बोलविले. त्यानंतर तलावात दोघा युवकांचे शोध कार्य सुरू करण्यात आले.

याबरोबच युवकाचें कुटुंबिय व त्यांच्या गल्लीतील पोहाणारे तरूणही घटनास्थळी पोहाचले. त्यांनी देखील मयत शोध सुरू केला. अखेर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोघा युवकांचे मृतदेह पाण्यात मिळून आले. त्यांना हिरे वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत मोहाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान बकरी ईदच्या दुसर्‍याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे दिलदार नगरात शोककळा पसरली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com