धुळे | प्रतिनिधी

शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीवर पोलिसांनी दुचाकीवर नशेच्या गोळ्या घेवून जाणार्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून ५ हजार ४०० रूपयांच्या नशेच्या गोळ्या व दुचाकी असा एकुण ४५ हजार ४०० रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

आज मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शाम नारायण साळे (वय ५२ रा. देवपूर) यांच्या फिर्यादीवरून दोघांवर चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गाजवळील चाळीसगाव चौफुलीवर सपोनि संदीप पाटील यांच्यासह पथकाने मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास सापळा लावून दुचाकीस्वारांना पकडले. त्यांच्याजवळील चारही बॉक्समध्ये मानवी आरोग्यावर परिणाम करणारे तसेच नशा व झोप आणणार्या औषधी गोळ्याचा साठा मिळून आला.

त्यामुळे जमालउद्दीन शेख मुजबउद्दीन शेख (वय २१ रा. कुबा मशिद जवळ, धुळे) व शेख राहील गुलाम हुसैन (वय २३ रा. गरीब नवाज नगर, धुळे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ५ हजार ४०० रूपये किंमतीच्या २ हजार २५० गोळ्या व ४० हजारांची दुचाकी (क्र. एमएच १८ यु ९४५७) असा एकुण ४५ हजार ४०० रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

याबाबत शाम नारायण साळे (वय ५२ रा. देवपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांवर चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पीएसआय योगेश ढिकले करत आहेत.