वाळूच्या ट्रकची मोटारसायकलला धडक, दोघे चुलत भाऊ जागीच ठार

वाळूच्या ट्रकची मोटारसायकलला धडक, दोघे चुलत भाऊ जागीच ठार

शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ ते टाकरखेडादरम्यान हॉटेल साईजवळ भरधाव वेगातील रेतीच्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने कळंबू ता.शहादा येथील दोघे चुलत भाऊ जागीच ठार झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.25 रोजी दुपारी तीनवाजेच्यादरम्यान रेतीने भरलेला ट्रक (क्रमांक एम.एच.18 बी.जी.1495) शहादाकडून दोंडाईचाकडे रेती भरून जात होता. त्यावेळी स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्रमांक एमएच 39-3098) ही समोरुन येत असतांना निमगुळ ते टाकरखेडादरम्यान ट्रकने या मोटरसायकलीला समोरुन धडक दिली. यात राकेश पोपट बोरसे (वय 37) व पुष्पराज प्रकाश बोरसे (वय 19) हे दोन्ही चुलत भाऊ जागेवरच ठार झाले.

घटना घडताच ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. यावेळी टाकरखेडा ग्रामस्थांच्या मदतीने मयताना दोंडाईचा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.ललितकुमार चंन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करण्यात आले.

मयत राकेश हा घरचा कर्तापुरुष होता. त्याच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा तर सहा वर्षांची एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. मयत राकेश बोरसे याचा भाऊ बी.एस.एफ आसाम येथे कार्यरत आहे. पुष्पराज हा प्रकाश भोमराज बोरसे यांचा एकुलता एक मुलगा होता. तो गेल्यावर्षी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन वडिलांना शेतीच्या कामात मदत करत होता. त्याच्या पश्चात एक विवाहित बहीण व आई वडील असा परिवार आहे.

कळंबू येथील उदयभान बोरसे यांनी याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास दोंडाईचा पो. स्टे चे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष लोले यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.पाटील व हवालदार सैंदाणे करीत आहेत. रात्री 9 वाजेच्या सुमारास कळंबू येथे दोघांवर शोकाकूल वातावरणात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com