राज्यातील 45 लाख व्यापार्‍यांचे व्यवहार ठप्प

राज्यातील 45 लाख व्यापार्‍यांचे व्यवहार ठप्प

दीड महिन्यांपासून पडीक वस्तूंचे नुकसान; भाववाढीची शक्यता

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे राज्यभरातील सुमारे 45 लाख व्यापार्‍यांवर मोठे संकट आले आहे. या संकटातून सावरण्यासाठी ज्या प्रमाणे शेतकरी, रिक्षा चालक, बांधकाम कामगारांना अनुदान जाहीर केले आहे.

त्याचप्रमाणे ज्या व्यापार्‍यांचे दोन कोटीच्या आत व्यवहार असतील अशा व्यापार्‍यांना दहा हजाराचे अनुदान जाहीर करावे. तसेच यापुढे ‘लॉकडाऊन’ न करता, काही प्रमाणात शिथीलता देण्याची भूमिका अखिल भारतीय कॅट असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष दिलीप गांधी यांनी मांडली.

करोना संक्रमणाची परिस्थिती आता आटोक्यात येवू लागली आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन न करता, व्यापार्‍यांसोबत चर्चा करुन निर्णय घ्यावा. आठवड्यातील प्रत्येकी दोन दिवस कपडा व्यवसाय, इलेक्ट्रिक साहित्य, हार्डवेअर, सोने-चांदी यासह अन्य प्रतिष्ठानांना शिथिलता द्यावी. त्यासाठी सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत वेळ निश्चित करावी. जेणेकरुन गर्दी होणार नाही.

दिलीप गांधी, राज्य उपाध्यक्ष, अ.भा. कॅट, असोसिएशन

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांकडे पडीक असलेल्या मालाचे नुकसान होत असून, व्यापार्‍यांना हे नुकसान सहन करावे लागत आहे. व्यापार करीत असतांना दुकानाचे भाडे, व्याजाचे हप्ते, दुकानातील कामगारांचे पगार, अन्य काही संबंधीत खर्च सुरु आहेत. त्यामुळे राज्य शासनाने दोन कोटींच्या आत व्यवहार असणार्‍या व्यापार्‍यांना त्यांच्या खात्यात कमीत-कमी दहा हजाराची रक्कम जमा करावी. अशी मागणी दिलीप गांधी यांनी केली.

करोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत काही व्यापार्‍यांसह त्यांचे कुटुंबिय बाधित झाले आहेत. काहींच्या घरातील तर कर्ता माणूस गमावल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. लॉकडाऊनमुळे व्यवहार बंद असल्याने उदरनिर्वाहासाठी काही व्यावसायिकांवर अक्षरशः भाजीपाला, फळविक्री करण्याची वेळ आली आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून उत्पादन बंद आहे. त्यामुळे वस्तुंचा तुटवडा निर्माण होईल. परिणामी यंदा भाववाढीची शक्यता आहे. तसेच लॉकडाऊनपुर्वी किरकोळ व्यावसायिकांनी मध्यम व्यापार्‍यांकडून उधारीने मालाची खरेदी केली आहे. किरकोळ व्यावसायिकांकडे जी काही जमा पुंजी असेल त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह सुरु आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने उधारीसुध्दा डुबण्याची शक्यता असल्याचेही गांधी यांनी सांगितले. त्यामुळे शासनाने व्यापार्‍यांबाबत सकारात्मक पध्दतीने विचार करुन अनलॉक बाबत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा देखील दिलीप गांधी यांनी व्यक्त केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com