धुळे । प्रतिनिधी Dhule

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती निवडीसाठी दि. 18 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता विशेष सभा होणार आहे.

पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संजय यादव हे काम पाहतील. तर सभापती निवडीसाठी प्रक्रिया दि. 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तर सभापती पदासाठी इच्छूक असलेल्यांनी हालचालींना वेग दिला आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती तसेच उपसभापती निवडीसाठी दि. 18 फेब्रुवारीला सकाळी विशेष सभा होणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संजय यादव हे काम पाहतील. याबाबतचे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

नुकतीच स्थायी समितीच्या आठ आणि महिला बालकल्याण समितीच्या 11 सदस्यांची निवड झाली. 1 फेब्रुवारीला सभापतींचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन सभापती निवडीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

आजपासून प्रक्रिया सुरु

स्थायी सभापती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती निवडीसाठी दि. 15 फेब्रुवारीपासून प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयात नामनिर्देशन पत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ही प्रक्रिया दोन दिवस म्हणजे 15 व 16 फेब्रुवारी दरम्यान सुरु राहिल. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान नामनिर्देशन पत्र मिळतील व दाखल करुन घेण्यात येतील. त्यानंतर दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता विशेष महासभेत सभापतीची निवड होईल.

सभेच्या प्रारंभी अर्जांची छाननी करण्यात येवून माघारीसाठी 15 मिनिट वेळ देण्यात येईल. त्यानंतर आवश्यकता भासल्यास मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल. अशीच प्रक्रिया महिला व बालकल्याण सभापती व उपसभापती निवडीसाठी राबविली जाणार आहे.

हालचालींना सुरुवात

महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपद हे महत्वपुर्ण असल्यामुळे हे पद मिळविण्यासाठी इच्छुकांनी हालचाली सुरु केल्या आहेत. सभापती पदासाठी शीतल नवले, संजय जाधव, नागसेन बोरसे यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपाकडून पहिल्या वर्षी सभापती पदासाठी युवराज पाटील यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर दुसर्यांदा सुनिल बैसाणे यांची सभापती पदासाठी वर्णी लागली. परंतू आता सभापती पद पुन्हा मिळण्यासाठी बैसाणे हे देखील इच्छूक आहेत. दोन वर्षाचा कालावधी असल्यामुळे प्रत्येकी एक वर्षासाठी सभापती पद देण्याचा फार्म्युला पक्षश्रेष्ठींनी तयार केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इच्छूकाला एका वर्षासाठीच सभापती पद मिळेल.

महिला व बालकल्याण सभापती पदासाठी अनेक जण इच्छूक आहेत. परंतू वंदना भामरे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. स्थायी व महिला बालकल्याण समिती सभापती पदाच्या नावावर पक्षश्रेष्ठीच शिक्कामोर्तब करतील. असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

स्थायीमधील पक्षीय बलाबल

पक्ष सदस्य संख्या

भाजपा 11

राष्ट्रवादी 2

काँग्रेस 1

समाजवादी पार्टी 1

एमआयएम 1

एकूण 16