धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरातील वृक्षांची जातीनिहाय गणना करण्यास मनपाच्या वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून एजन्सीला काम देण्यात येईल, असेही आयुक्त अजीज शेख यांनी सभेत स्पष्ट केले. दरम्यान सभेत विविध ठिकाणची 75 झाडे तोडण्याच्या परवानगीच्या प्रस्तावांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची सभा आज सकाळी मनपाच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात आयुक्त अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्र. नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक हर्षकुमार रेलन, अमोल मासुळे, नगरसेविका वंदनाताई भामरे, अनिल थोरात, राहुल तारगे, मनोज शिरूडे आदी सदस्यांसह अधिकारी उपस्थित होते.

सभेत नगरसेवक अमोल मासुळे यांनी मनपा हद्दतील समाविष्ट झालेल्या गावांसह संपुर्ण शहरातील वृक्षांची जातिनिहाय जनगणना करावी, अशी सुचना केली. असे झाल्यास शहरातील वृक्षांची संख्या स्पष्ट होईल. तसेच त्यात ऑक्सिजन देणारी झाडे किती आहेत, हे समोर येईल. त्यामुळे भविष्यात वृक्षारोपण करतांना कोणती झाडे कोठे लावणे गरजेचे आहे, याचा विचार करता येईल, असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी नाशिक शहरात वृक्षांची जनगणना झाली आहे.

या धर्तीवर धुळे शहरातही वृक्षांची जनगणना करण्यासाठी बजेट तयार करण्यात येईल. तसेच निविदा काढून एजन्सीमार्फत काम करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शहरात गेल्यावर्षी मनपाला 40 हजार वृक्ष लावण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यापैकी किती वृक्ष लावण्यात आले, त्यातील किती जगले, याबाबत माहिती द्यावी, अशी सुचनाही नगरसेवक अमोल मासुळे यांनी केली.

सभेत नगरसेविका वंदनाताई भामरे यांनी सुचना केल्या. यावर आयुक्तांनी गेल्या वर्षी किती झाडे लावण्यात आली. त्यातील किती जगले, याचा आढवा घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले. दरम्यान सभेत विविध ठिकाणची सुमारे 75 झाडे तोडण्याच्या परवानगीचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्यात रस्ता व गटारींच्या कामास अडथळा ठरणार्या 37 झाडांचाही समावेश होता. तसेच शहरातील ग.नं. 27/3 मधील 1146 व ग.नं. 409/ब मधील 423 अशी 1569 सागाची झाडे तोडण्यासाठीचे शुल्क करणेबाबत सभेत चर्चा करण्यात आली.