तावखेडा परिसरात तरूणाचा संशयास्पद मृत्यू
धुळे

तावखेडा परिसरात तरूणाचा संशयास्पद मृत्यू

Balvant Gaikwad

तालुक्यातील तावखेडा येथील तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. एका शेतात नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. त्यांच्या अंगावरही मारहाण, खरचटल्याच्या खुना दिसून येत असल्याचे त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

प्रवीण लोटन पाटील (वय 27 रा. तावखेडा) असे मयत तरूणाचे नाव आहे. त्याची चारचाकी गाडी असून तो शिंदखेडा येथे शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचे काम करीत होता. आई-वडील नसल्याने तो घरात एकटाच राहत होता. काल त्याच्या बहिणीने बाहेरगावाहून अनेक वेळेस त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी गावात इतरांना फोन केले. त्यांचाही प्रवीण यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला.

तेव्हा बापू ओंकार कोळी यांच्या शेतात एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती गावात पसरली. ग्रामस्थांनी पाहणी केली असता तो प्रवीण पाटील असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयातील महिला डॉ. बोरुडे यांनी एक्सपर्ट डॉक्टर नसल्याने शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळे मृतदेह धुळे येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.

मयत प्रवीण याचा मृतदेह नग्न अवस्थेत होता. नाकातून रक्तस्त्राव सुरू होता. मांडीवर खरचटण्याच्या जखमा होत्या. यावरून त्याला गुप्तांग पिळून मारले असावे, असा अंदाज बांधला जात आहे. तसेच त्याला कानशिलात मारहाण केली असावी, त्यामुळे नाका तोंडातून रक्तश्राव झाला असावा, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

मयत प्रवीण पाटील यांचा भाऊ समाधान लोटन पाटील हा चाळीसगाव येथे राहतो. त्याला घटनेची माहिती कळवण्यात आली. प्रवीण हा स्वभावाने गरीब होता.

कसून चौकशी करावी

प्रविण हा शनिवारी विद्यार्थी वाहतूक करून तावखेड्यात परत गेला असावा. प्रसंगी तो कोणाला भेटला, त्याचे कोणाशी काही संबंध होत का, ते कोणाच्या निदर्शनास आले असता त्याची कुणकुण कोणास होती का, त्याच्या गाडीसह तेथून दुसरी कोणती गाडी असावी का, काही चर्चात्मक माहिती मिळते का, याआधारे पोलिसांनी चौकशी करावी. म्हणजे तपसातील सत्य लवकर उजेडात येईल. आता यापुढे पोलिस तपासावर सर्व काही अवलंबून आहे. दरम्यान नरडाणा येथील वाचमन खून प्रकरणाचा अद्यापही तपास लागला नाही.

ग्रामीण रूग्णालयाचा निष्काळजीपणा उघड

आज ग्रामीण रुग्णालयाने एक्सपर्ट नसल्याच्या कारणाने शवविच्छेदन नाकारले. यावरून शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय किती बेफिकीर आहे, हे समोर आले आहे. तर ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध साहित्यही निकृष्ट दर्जाचे वापरले जाते. त्यात जखमींना उपचारासाठी वापरण्यात येणारा कापूस, बांधली जाणारी कापडी पट्टी यावरूनच हे सहजच लक्षात येईल. वरिष्ठांनी याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com