धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्हापरिषद निवडणुकीत 50 टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण जावू नये असे निर्देश असतांना सरासरी 73 टक्के आरक्षण निघाल्याने सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात फेर निवडणुकीचे निर्देश दिले आहेत. यामुळे ओबीसी संवर्गातील 15 सदस्यांवर गदा आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

यापुर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्या.के. कृष्णमूर्ती यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत 50 टक्केच्या वर आरक्षण जावू नये असे निर्देश दिले आहेत.

मात्र मागील वर्षी धुळ्यासह अकोला, वाशीम, नंदुरबार आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणूका पार पडल्या.

यात धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे आरक्षण 73 टक्के निघाल्याने माजी कृषी सभापती किरण गुलाबराव पाटील यांनी याकडे लक्ष वेधले.

गट-गण रचनेच्या हरकत प्रसंगी देखील जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष झाले.

असा आकड्यांचा खेळ

धुळे जिल्हा परिषदेत एकूण 56 गट आहेत. पैकी 73 टक्के म्हणजेच 41 जागांवर आरक्षण काढण्यात आले. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अनुसूचित जाती संवर्गासाठी 3, जमातीसाठी 23 जागांवर आरक्षण निघाल्याचे सांगितले.

मात्र शिरपूर आणि साक्री तालुक्यात ओबीसी संवर्गासाठी एकही जागा आरक्षीत ठेवली नाही. मात्र शिंदखेडा तालुक्यात 4 आणि धुळे तालुक्यात 11 जागा ओबीसी संवर्गासाठी आरक्षीत ठेवण्यात आल्या. याचवेळी सर्वसाधारण संवर्गासाठी शिरपूर तालुक्यात 4, शिंदखेड्यात 4, साक्री तालुक्यात 5 आणि धुळे तालुक्यात 2 अशा 15 जागा आरक्षीत केल्या.

साक्री आणि शिरपूर तालुक्यात ओबीसी संवर्गाचे प्रतिनिधीत्व डावलण्यात आल्याच्या मुद्याकडे किरण पाटील यांनी लक्ष वेधले. याच मुद्याला धरुन बोरकुंड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रकाश धुडकू भदाणे यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली.

यावर आज 4 मार्च रोजी कामकाज झाले. न्या.खानविलकर, न्या.माहेश्वर, न्या.मल्होत्रा यांच्या त्रिस्तरीय पीठाने निर्णय देवून धुळे तालुक्यातील 11 व शिंदखेडा तालुक्यातील 4 ओबीसी संवर्गातील गटांमध्ये दोन आठवड्यात फेर निवडणूक प्रक्रिया करावी असा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. याचिका कर्ते यांच्या वतीने अॅड.सुधांशिव चौधरी, अॅड.विकाससिंग, अॅड. अमोल कारंडे, अॅड.प्रल्हाद बचाटे, अॅड.एल.पी. ठाकूर यांनी कामकाज पाहिले.

समाधान अन् जल्लोष

जास्तीच्या आरक्षणामुळे निर्माण झालेला पेच आज सुटला असून आपली मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्यकरीत निकाल दिल्याने किरण पाटील व याचिकाकर्ते प्रकाश भदाणे यांनी समाधान व्यक्त केले.

या निर्णयाची वार्ता धुळ्यात येवून धडकताच अनेकांनी किरण पाटील यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले. यात माजी आ.प्रा.शरद पाटील, सुनिल नेरकर, प्रभाकर भदाणे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.

जिल्हा परिषदेच्या आवारात विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, डॉ.भरत राजपूत आदिंनी फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले.