तीन दिवसांपूर्वी घरी आलेल्या जवानाचे हृदयविकाराने निधन

तीन दिवसांपूर्वी घरी आलेल्या जवानाचे हृदयविकाराने निधन

नगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कापडणे - Kapadane - प्रतिनिधी :

धुळे तालुक्यातील नगाव येथील सैन्य दलातील जवान संदेश रोहिदास बैसाणे यांचे हृदयविकाराने निधन झाले.

तीन दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानाचे अचानक निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर आज नगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नगाव येथील सैन्य दलातील जवान संदेश रोहिदास बैसाणे (वय 28) हे तीन दिवसांपूर्वी गावी रजेवर आले होते.

सोमवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास बैसाणे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तत्काळ धुळे येथील खाजगी रुग्णलायात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून मृत झाल्याचे सांगितले.

संदेश बैसाणे हे सेवन महार बटालियनमध्ये लुधियाना येथे कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक अडीच वर्षाचा मुलगा, दोन बहिणी व वडील असा परिवार आहे. संदेश बैसाणे यांचे लग्न अवघे पाच वर्षांपूर्वी झाले होते. बैसाणे यांना घरी येऊन फक्त दोन दिवस झाले होते.

संदेश बैसाणे हे लुधियाना येथून नगाव गावी 28 दिवसाच्या रजेवर आले होते. संदेश बैसाणे यांचे वडील देखील सैन्य दलात होते, ते आता निवृत्त झाले आहेत.

संदेश बैसाणे यांच्यावर मंगळवार रोजी नगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी सैन्य दलातील जवांनासह देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com