जिल्ह्यात दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरू राहणार

जिल्हादंडाधिकारी संजय यादव : अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद
जिल्ह्यात दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरू राहणार
USER

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 28 जूनपासून अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने (औषधी दुकाने, वैद्यकीय सेवा वगळून) इतर सर्व प्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.

अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने व आस्थापना वगळता अन्य दुकाने शनिवार, रविवारी पूर्ण बंद राहतील, असा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी दिला आहे.

कोरोना विषाणूमुळे उद्भवणार्‍या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. नियंत्रणासाठी आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

डेल्टा, डेल्टा प्लस सारख्या नवीन स्वरुपामध्ये विषाणूचा प्रसार होत असून व्यापक भौगोलिक क्षेत्रासह (4 - 6) आठवड्यामध्ये तीव्र स्वरुपात तिसरी लाट वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध प्रशासकीय पातळीवर लावण्यात आलेे आहे.

ब्रेक द चेन बाबतचे प्रतिबंधात्मक आदेश अधिक्रमित करुन संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या महसुली हद्दीमध्ये दि. 28 जूनच्या सकाळी 5 वाजेपासून फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 अन्वये कोणत्याही व्यक्तीस सायंकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत मुक्तपणे संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

संचारबंदी कालावधीत आरोग्य विभाग, पोलिस विभाग, महसूल विभाग, अग्निशमन विभाग, एमएसईबी, महापालिका व नगरपालिका कार्यालये व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व कार्यालयातील अधिकारी , कर्मचार्‍यांना ये-जा करण्यास सूट राहील. मात्र, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील.

मुंबई पोलिस अधिनियमाचे कलम 37 (1) (3) नुसार दररोज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी एका वेळेस पाच पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई राहील. अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने सोमवार ते शूक्रवार दरम्यान दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू (मेडीकल दुकाने व वैद्यकीय सेवा वगळून सुरू राहतील.

दुकानांच्या प्रवेशाच्या ठिकाणी, काऊंटरसमोर एका वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही. दुकान मालक व चालकांनी दुकानांच्या दर्शनी भागात बँक काऊंटर प्रमाणे काच, प्लास्टिकचे पारदर्शक शीट किंवा कमी खर्चात करावयाचे असल्यास पारदर्शक प्लास्टिक पडद्याचा वापर करणे बंधनकारक राहील.

या पडद्यातून केवळ ग्राहकास वस्तूंची देवाण-घेवाण करता येईल एवढीच मोकळी जागा ठेवावी. शॉपिंग मॉल, थिएटर्स (नाट्यगृह,मल्टीप्लेक्स, सिंगल स्क्रिन) बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, बार 50 टक्के ग्राहक क्षमतेसह सुरू राहतील. शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहतील. केवळ पार्सल सुविधा, टेक अवे, घरपोच सुविधा देता येतील.

लग्न समारंभास 50 जणांना तर अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांना परवानगी राहील. बांधकामाच्या ठिकाणी मजूर राहत असल्यास अशी बांधकामे सुरू राहतील. मात्र, दुपारी 4 वाजेनंतर मजुरांना ये- जा करण्यास मनाई राहील. कृषीशी संबंधित कामे दररोज दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. ई कॉमर्स सुविधा अत्यावश्यक सेवा व इतर प्रकारच्या सेवांसाठी दररोज सुरू राहील.

जिम, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा सेंटर, वेलनेस सेंट 50 टक्के ग्राहक क्षमतेसह केवळ प्री-बुकिंग पध्दतीने दररोज 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. एसीचा वापर करण्यास मनाई राहील. सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेसह सुरू राहील.

मात्र, उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील. माल वाहतूक व्यवस्था सुरू राहील. मात्र, केवळ 3 व्यक्तींचा (वाहनचालक, क्लिनर, हेल्पर) समावेश राहील. आंतर-जिल्हा प्रवास सुरू राहील. मात्र, 5 मध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रवासासाठी पोलिस विभागाकडून ई- पास घेणे आवश्यक राहील.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com