दुकानांना सायंकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी

नागरिक  खरेदीसाठी गर्दी करीत आहेत तर  सोशल डिस्टनसिंग पाळले जात नाही
नागरिक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत तर सोशल डिस्टनसिंग पाळले जात नाही

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा साडेचार हजाराच्या पुढे गेला आहे. तरी देखील नागरिक गांभिर्याने घेत नसून शहरातील गरुड कॉम्प्लेक्समध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. सोशल डिस्टनसिंग पाळले जात नाही.

शासनाचे निर्देश धाब्यावर बसविले गेले आहेत. त्यामुळे जिल्हा व महापालिका प्रशासन देखील हतबल झाले असतांनाही आता प्रशासनानेच सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे अधिकजण परस्परांच्या संपर्कात येवून वाढण्याची भितीही व्यक्त केली जाते आहे.

जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या हद्दीत सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये शिथीलता निर्माण केली जाते आहे. कोरोनाबाबत काळजी घेवून पुर्वपदावर येण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मात्र शहरातील रस्त्यांवर गर्दी होत आहे. एवढेच नव्हे तर शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथे खरेदीसाठी नागरिकांची सकाळी साडेआठ वाजेपासून गर्दी होते. तर दुकान बंद होईपर्यंत गर्दी कायम राहते. साक्री रोडवर वाहने पार्किंग केली जातात. तेथेही सोशल डिस्टन्स पाळले जात नाही.

महापालिका प्रशासनाने गरुड कॉम्प्लेक्समधील काही व्यापारी शासनाचे निर्देश व सोशल डिस्टन्स पाळत नाहीत. दुकानांवर ग्राहकांची गर्दी होते. यामुळे महापालिका प्रशासनाने या व्यापार्‍यांना ताकीद देवून यांच्यावर कारवाई करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात पत्र दिले होते. परंतू या व्यापार्‍यांवर कारवाई न झाल्यामुळे पुन्हा जैसे थी परिस्थिती झाली आहे. प्रशासन एकीकडे कोरोना महामारी रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेत आहेत. तर दुसरीकडे नागरिक बिनधास्त फिरत असल्यामुळे रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

शासनाचा अंदाज खरा ठरला

साधारणतः अडीच महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र शासनाने राज्यातील जिल्हानिहाय संभाव्य कोरोना बाधितांची संख्या जाहीर केली होती. 15 ऑगस्ट पर्यंत कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती बाधित होवू शकतात याबाबतचा हा अंदाज होता.

धुळे जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार बाधित होतील, असे शासनाने त्याचवेळी म्हटले होते. शासनाचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून स्वातंत्र्यदिना आधीच धुळे जिल्ह्यातील बाधितांनी साडेचार हजाराचा आकडा ओलांडला आहे.

आज जिल्ह्यातील बाधितांची संख्या चार हजार 850 इतकी झाली आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाला याबाबत सूचित करण्यात आले होते. मात्र आपण एव्हढा आकडा ओलांडणारच नाही अशा भ्रमात असलेले प्रशासन आता उघडे पडले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com