अनेर धरणाचे पाणी सोमवारीच पाटचारीत सोडले

आ. काशिराम पावरा यांच्या सूचनेची अंमलबजावणी, लवकरच सोडणार नदीत
अनेर धरणाचे पाणी सोमवारीच पाटचारीत सोडले

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

अनेर धरणाचे पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी तात्काळ सोडण्यात यावे, अशी सूचना आ. काशिराम पावरा यांनी दिली होती. त्यानुसार सोमवार दि. 3 मे रोजीच धरणाचे पाणी पाटचारीत सोडल्याचे सांगण्यात आले.

मात्र अनेर धरणाचे पाणी फक्त पाटचारीत सोडण्यात आले असून लवकरच ते नदी पात्रातही सोडण्यात येणार आहे.

पाणी सोडल्यानंतर आ. काशिराम पावरा यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, बाजार समिती संचालक अविनाश पाटील, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, जितेंद्र सूर्यवंशी आदींनी पाटचारीनजीक जावून खात्र केलाी.

अनेर धरणाचे पाणी नदी व पाटचारीमध्ये तात्काळ सोडण्यात यावे याबाबतचे पत्र आ. पावरा यांनी शिरपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना 20 एप्रिल रोजी दिले होते.

परंतु वरिष्ठ पातळीवरून अहवाल आला नाही, या कारणावरून पाणी अद्यापपर्यंत सोडण्यात आलेले नव्हते. याबाबत आ. पावरा यांनी तातडीने पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तालुक्यातील काही पदाधिकारी व शेतकरी यांची दि. 30 एप्रिल रोजी बैठक घेतली.

या बैठकीत ते म्हणाले, अनेर धरणात सध्या 67 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या परिसरातील अनेक शेतकर्‍यांना पाण्याची प्रतिक्षा असून अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व गुराढोरांना देखील पाण्याची नितांत गरज आहे.

हे सर्व लक्षात आणून दिल्यावर देखील अधिकारी तातडीने अंमलबजावणी का करत नाहीत, याबाबत आमदारांनी संताप व्यक्त केला होता.

तसेच फोनवरून वरिष्ठ अधिकार्‍यांचीही कडक शब्दात सुनावणी केली होती. व संबंधितांना कडक सूचना दिल्यात. त्यानुसार सोमवारी पाटचारीत पाणी सोडण्यात आले आहे.

या बैठकीला के. डी. पाटील, सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, अरुण धोबी, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, साखर कारखाना संचालक भरत पाटील, पिळोदा येथील उपसरपंच योगेश बोरसे, घोडसगाव सरपंच हुकुमचंद पाटील, उपसरपंच पितांबर धनगर, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी. के. राजपूत आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com