कोविड सेंटरमध्ये हवेतून ऑक्सिजनच्या प्रकल्पाचे काम सुरु

शिरपूरच्या पटेल परिवाराचे दातृत्व
कोविड सेंटरमध्ये हवेतून ऑक्सिजनच्या प्रकल्पाचे काम सुरु

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

माजी मंत्री, आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या 40 लाख रुपये देणगीतून मुकेशभाई पटेल जम्बो कोविड सेंटरमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणार्‍या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.

येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध होऊन रुग्णांची मोठी सोय होणार असल्याची माहिती शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी दिली.

गेल्या 9 वर्षांपासून शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. याच धर्तीवर शिरपूरमध्ये आता दुसरा ऑक्सीजन निर्मितीचा मोठा प्रकल्प उदयास येत आहे.

शिरपूर वरवाडे नगरपरिषद संचलित मुकेशभाई पटेल टाऊन हॉलमध्ये सुरु करण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये पटेल परिवाराचे दातृत्व व योगदानातून तसेच त्यांच्या सुमारे 40 लाख रुपये आर्थिक देणगीतून ऑक्सिजन निर्मितीचा हा मोठा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

सुमारे 30 ते 32 मोठे सिलिंडर एवढ्या क्षमतेने दररोज ऑक्सिजन निर्मिती होऊन रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. मुकेश पटेल जम्बो कोविड सेंटरमध्ये शासकीय दरात रुग्णांसाठी खाजगी डॉक्टर्सच्या मदतीने वैद्यकीय सेवा देण्यात येत असून रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी व गरजेपोटी ऑक्सिजन साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा हा प्रकल्प बाहेरून हवा कॉम्प्रेसरमध्ये ओढली जाऊन ती हवा एअर रिसिव्हरद्वारे एका टँकमध्ये गोळा केली जाते.

त्यानंतर एअर ड्रायरमध्ये हवा शुद्ध होऊन ती ड्राय युमिलिटी काढून शुद्ध हवा तयार केली जाते. हवेतील विषाणू बाहेर काढले जातात. स्टोरेज ऑक्सिजन टँकमधून सेंट्रल लाईन पाईपद्वारे रुग्णापर्यंत शुद्ध ऑक्सिजन पुरविला जातो.

मुकेश पटेल टाऊन हॉलमध्ये उभारण्यात येणारा ऑक्सिजनच्या मोठा प्रकल्प व शिरपूर वरवाडे नगर परिषदेने गेल्या नऊ वर्षांपूर्वी इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मध्ये उभारलेला ऑक्सिजन प्रकल्प यामुळे रुग्णांना संजीवनी मिळणार असल्याने गेल्या 35 वर्षांपासून शिरपूर तालुक्यातील जनतेची होणारी सेवा यापुढेही अखंडितपणे आमच्या मार्फत सुरूच राहणार असल्याची माहिती माजीमंत्री, आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com