शिरपूर : सासर्‍याने जावयाचा गळा दाबून केली हत्या

जुने भामपूर येथील घटना, सासर्‍यासह दोघा शालकाविरूध्द गुन्हा
शिरपूर : सासर्‍याने जावयाचा गळा दाबून केली हत्या

शिरपूर - Dhule - Shirpur

मुलीस मारहाण केल्याचा रागामुळे सासर्‍याने जावयाला मारहाण करून गळा दाबून हत्या केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील जुने भामपूर येथे दि. 12 जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

विजय बन्सीलाल भिल रा. जुने भामपूर ता. शिरपूर हा दि.12 जुलै रोजी दुपारी अडीच वाजता शेतमजुरी करुन घरी आला असता पत्नी कविता विजय भिल हिने स्वयंपाक न केल्यावरून किरकोळ वाद झाला. वादानंतर पत्नी कविता हिने जावदा ता. शहादा येथे वडील ओंकार शंकर ठाकरे, भाऊ अंबालाल ओंकार ठाकरे व ज्ञानेश्वर ओंकार ठाकरे यांना फोनवरून वादाची माहिती दिली.

त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास ओंकार शंकर ठाकरे, अंबालाल ओंकार ठाकरे व ज्ञानेश्वर ओंकार ठाकरे यांनी भामपूर येथे येऊन विजय यास शिवीगाळ करून कवितांच्या दोन्ही भावांनी व वडीलांनी हाताबूक्यांनी मारहाण करीत गळा दाबला. यामुळे विजयचा श्वासोच्छास दाबला गेल्याने त्याची हालचाल बंद झाली. आरडाओरडा ऐकुन घटनास्थळी विजयचे भाऊ व इतर लोकांना आल्याचे पाहून शालक, सासरे, पत्नी यांनी पलायन केले. विजयला उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले तेथे डॉक्टरांनी विजय याला मयत घोषित केले.

याप्रकरणी मयताचे भाऊ अजय बन्सीलाल भिल रा. जुने भामपुर, ता.शिरपूर यांनी तक्रार दिल्यावरून ओंकार शंकर ठाकरे, अंबालाल ओंकार ठाकरे व ज्ञानेश्वर ओंकार सर्व रा. जावदा ता. शहादा जि. यांच्या विरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुरनं 144/2020 भादंवी कलम 302, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पीएसआय सागर आहेर, पोना अनिल शिरसाठ, धनगर व कर्मचार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली.

तपास पथकाने म्हसावद पोलीस ठाण्याच्या पोलिस पथकाच्या सहाय्याने रात्रीच तिन्ही संशयितांना जावदा येथून अटक केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com