झोपडीतील बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई; तीन लाखांचा मुद्येमाल जप्त
झोपडीतील बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे एका घराच्या मागे झोपडीत सुरू असलेला बनावट दारू कारखाना तालुका पोलीस ठाण्याचे

सपोनि.अभिषेक पाटील यांनी उध्वस्त केला. या ठिकाणाहून तब्बल 3 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लाकड्या हनुमान येथील धनराज रेशम्या पावरा याच्या घरामागील झोपडीत बनावट दारू कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती काल सपोनि.अभिषेक पाटील यांना मिळाली.

त्यांनी पोसई.दीपक वारे, हेकॉ.हेमंत पाटील, सुनिल मोरे, पोना.संजीव जाधव, पवन गवळी, कुंदन पवार, संतोष देवरे,पोकॉ.आरीफ पठाण, शामसिंग पावरा, महिला पोकॉ.सुनिता पवार, शितल खैरनार यांना सोबत घेऊन काल सायंकाळी 5.30 च्या सुमारास छापा टाकला.

दरम्यान, पोलीस येत असल्याचे पाहून धनराज पावरा हा त्या ठिकाणाहून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलागही केला. मात्र तो हाती लागला नाही.

तथापि, झोपडीत 200 लिटरचे 9 ड ममध्ये बनावट दारू बनविण्यासाठी लागणारे 2 लाख 70 हजार रूपये किंमतीचे रसायन, 10 हजार रूपये किंमतीचे बॉटल बूच सील करणारे मशिन, 14 हजार 400 रूपये किंमतीचे टँगो पंच ब्रॅण्ड दारूचे 6 खोके, 2 हजार रूपये किंमतीचे टँगोपंच लेबल असलेल्या व पोत्यात भरलेल्या 180 मि.ली.च्या रिकाम्या बाटल्या व 800 रूपये किंमतीचे रिकामे कॅन मिळून सुमारे 2 लाख 97 हजार 700 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोना.संतोष देवरे याच्या फिर्यादीवरून धनराज पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि.अभिषेक पाटील करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com