सरपंचाकडून महिलेला मारहाण

सरपंचाकडून महिलेला मारहाण

साक्री - sakri - प्रतिनिधी :

तालुक्यातील पेरेजपूर गावात दोन कुटुंबात भिंतीच्या बांधकामावरुन वाद सुरू असतांना सरपंच मनोज देसले यांनी एका महिलेला मारहाण केली.

तर दुसर्‍या गटाकडूनही सरपंचासह तिघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी साक्री पोलिसात परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पेरेजपूर गावात हेमंत निंबा शेवाळे यांचे वडिलोपार्जित घर असून या घराची भिंत पाण्यात भिजवून पडीत झाली होती.त्यामुळे त्यांनी जिर्ण भिंत पाडून नवीन भिंत बांधण्याचे ठरविले.

दि.15 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास या भिंतीचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या शेजारी राहणार्‍या विमलबाई गुलाब अहिरे, पती गुलाब अहिरे व मुलगा राहुल अहिरे यांनी भिंत बांधकामावर आक्षेप घेत वाद निर्माण केला. त्यामुळे हेमंत शेवाळे यांनी सरपंच मनोज देसले यांना या वादाच्या निवारणासाठी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून घटनास्थळी बोलावले.

सरपंच मनोज देसले हे घटनास्थळी आल्यानंतर शेवाळे व अहिरे कुटुंबीयांमध्ये भांडण सुरू होते. यावेळी सरपंच मनोज देसले यांनी दोन्ही कुटुंबामध्ये वाद वाढत गेल्याने तो थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाद अधिक वाढून शिवीगाळ व मारहाण करण्यापर्यंत प्रकरण गेले. या घटनेत सरपंच मनोज देसले यांनी विमलबाई अहिरे यांना मारहाण केली.

यानंतर अहिरे कुटुंबीयांनी पुनम शेवाळे व हेमंत शेवाळे तसेच सरपंच मनोज देसले यांनाही मारहाण केली. यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी करून हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. याबाबत साक्री पोलीस ठाण्यात विमलबाई गुलाब अहिरे (वय 60) यांनी सरपंच मनोज देसले व हेमंत शेवाळे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली.

तर सरपंच मनोज देसले (वय 39) यांनी व पुनम हेमंत शेवाळे (वय 39) यांनी वेगवेगळ्या फिर्याद देवून विमलबाई अहिरे, गुलाब अहिरे व राहुल अहिरे यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ नागेश्वर सोनवणे करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com