ट्रक- कारची धडक, तरूण ठार
धुळे

ट्रक- कारची धडक, तरूण ठार

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

साक्री - Sakri- प्रतिनिधी :

साक्री - नवापूर महामार्गावर ट्रक आणि कारमध्ये भिषण अपघात होऊन कार चालक जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अपघातात कारचा चक्काचुर झाल्याने मयत चालक कारमध्येच अडकला होता. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांनी कारला ओढून मयतास बाहेर काढण्यात आले.

आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास दहिवेलकडून साक्री कडे येणारी भरधाव कार (एमएच16 टी 5033) आणि समोरून येणार्‍या ट्रकची (क्र.जी.जे 25 यु 1224) यांंच्यात हॉटेल हिरा गार्डन लगत समोरासमोर धडक झाली.

त्यात कार चालक सागर राजेंद्र पाटील (वय 30) हा जागीच ठार झाला. तर हर्षद भिकनराव सोनवणे (वय 24) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोघे मित्रांसोबत पुणे येथील काम आटोपून रात्रीचा प्रवास करीत गावाकडे परतत होते. त्यादरम्यान सामोडेकडून दहिवेलमार्गे सुरपान (ता.साक्री) येथील मित्राला घरी सोडून साक्रीकडे येत असतांना हा अपघात झाला. अपघाताची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

अपघाताची माहिती मिळतसच साक्री पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख हे वाहतूक शाखेचे कर्मचारी सोमनाथ पाटील, होमगार्ड पोपट मारनर, चालक परदेशी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी हर्षद सोनवणे यास गाडीतून बाहेर काडून खाजगी वाहनाने त्यास रूग्णालयात दाखल करण्यात आले.

तर कारचा चक्काचुर झाल्याने सागर पाटील हा वाहनात अडकून पडल्याने त्यास बाहेर काढणे कठीण झाले होते. त्याल दरवाजातून बाहेर काढता येत नसल्यामुळे टामीने दरवाजा तोडून बाहेर काढण्याचा प्रयत्नही असफल ठरला.

अखेर कारला दोन्ही बाजूने ट्रक आणि आयशर वाहन लावून ताण देऊन मयत सागरला बाहेर काढण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती.

अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. या अपघाताबाबत हर्षद सोनवणे यांनी साक्री पोलिसात फिर्याद दाखल केली असुन ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम, हेकाँ नागेश्वर सोनवणे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com