सकारात्मक विचार हेच जीवनाचे प्रभावी सूत्र

पूज्य आनंद जीवन स्वामींचे उपदेश.. रोटरी क्लब धुळे क्रॉसरोड आणि दै.देशदूतचा उपक्रम
सकारात्मक विचार हेच जीवनाचे प्रभावी सूत्र

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

कोरोनाचे संकट मोठे आहे. संपूर्ण विश्व या संकटाने व्यापले आहे. मात्र अशा परिस्थितीत वैद्यकीय उपचारा सोबतच भारतीय सनातन सिध्दांतातील आयुर्वेद उपचार प्रभावी ठरत आहेत.

परंतु स्वस्थ व आनंदी राहण्यासाठी सकारात्मक विचारधारा हेच महत्वाचे सूत्र असून संयम, भक्ती आणि संतांचे चरित्र याची जोड देवून जीवनाला आणखी आनंदी बनवता येवू शकते, असे विचार पूज्य आनंद जीवन स्वामी यांनी मांडले.

रोटरी क्लब धुळे क्रॉसरोड आणि दै. देशदूतच्या वतीने आजपासून विधायक, मार्गदर्शक उपक्रम राबविण्यात येत आहे. यात दररोज सायंकाळी 4 वाजता विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन होणार आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ आज धुळ्यातील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी पूज्य आनंद जीवन स्वामी यांच्या अमृत वाणीने करण्यात आला. प्रारंभी या संपूर्ण मंदिराचे अत्यंत आकर्षक, विलोभनीय दर्शन घडविण्यात आले. या मंदिरात अत्यंत आखीव, रेखीव अशा तब्बल 226 वेगवेगळ्या मूर्ती असून कोरीव नक्षी कामांचे 88 स्तंभ आहेत.

लोखड आणि सिमेंटचा वापर न करता केवळ राजस्थानी दगडांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या मंदिरात मूर्त स्वरुप देण्यासाठी सव्वाचार वर्षांचा कालावधी लागला. बीएपीएस अर्थात बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम संस्थेच्या अंतर्गत हे मंदीर उभारण्यात आले असून जगभरात 1300 मंदिरे आहेत. तर 1200 संत आणि करोडो भक्तगण या संस्थेशी जोडले गेलेले आहेत. धुळ्यातील या प्रशस्त देखण्या आणि खर्‍या अर्थाने मनाला प्रसन्नता व शांती देणार्‍या वा वास्तूपासून उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला.

पूज्य स्वामी म्हणाले कोरोनाच्या संकटात असंख्य डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, जीवनावश्यक सेवा देणारे सर्व घटक आणि समाजातील दानशूर, समाजसेवक आपापल्या परिने योगदान देत आहेत. स्वामी नारायण साप्रदायाच्या वतीने देखील दुबईहून 400 मेट्रीक टन तर युरोपहून 54 मेट्रीक टन ऑक्सीजनचा पूरवठा होत आहे. पाच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून ही संस्था देखील सहयोग देत आहे. परंतु आपल्याला मात्र आपल्याला हे संयमाने, सकारात्मक विचार घेवून पुढे जावे लागेल. भगवंताचे नामस्मरण आणि संतांचे चरित्र हीच आपली जगण्याची उर्मी असल्याचेही ते म्हणाले.

या उपक्रमासाठी देशदूतच्या खान्देश आवृत्तीचे संपादक हेमंत अलोने, ब्युरोचिफ अनिल चव्हाण, रोटरी धुळे क्रॉसरोडचे अध्यक्ष महेश शिंदे, सेक्रेटरी अमित ठक्कर, प्रोजेक्ट चेअरमन डॉ.विशाल वाणी, सुशांत खिलोसिया, रोटरी चोपडा क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव, सेक्रेटरी अ‍ॅड.रुपेश पाटील, पलावा क्लबचे अध्यक्ष मनोज पवार, सेक्रेटरी अंकित कणकणे आदिंनी पुढाकार घेतला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com