आरटीओसह 70 जणांवर दरोड्याचा गुन्हा
धुळे

आरटीओसह 70 जणांवर दरोड्याचा गुन्हा

Balvant Gaikwad

येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात एका सामाजिक कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी संबंधात आरटीओ जे.जे. पवार यांच्यासह 60 ते 70 जणांविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विरोध करुन कामाबाबत जाब विचारण्यावरुन हा वाद झाला.

वाहनाच्या पसंतीच्या क्रमांकाची माहिती घेण्यासाठी पुणे येथील सुनिल साळंकी हे या कार्यालयात आले असता तेथे आरटीओ पवार यांच्या वाढदिवसाची तयारी सुरु असल्याचे जाणवले. यामुळे सोळंकी यांनी वरीष्ठ अधिकार्‍यास संपर्क साधून इथे कामापेक्षा वाढ दिवस होत असल्याचे सांगितले. हे ऐकून राग आल्याने वाढदिवसाठी जमलेल्या 50 ते 60 जणांनी सोळंकी यांनी मारहाण केली.

त्यांच्या फिर्यादीवरुन आरटीओ पवार, या कार्यालयातील कर्मचारी व एका ड्रायव्हींग स्कूलच्या मालकासह 60 ते 70 जणांसह मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोळंकी यांच्याकडील रोख रक्कमेसह सोन्याची अंगठी व एटीएम कार्ड जबरीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दि. 24 रोजी दुपारी ही घटना घडली.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुनील खुशालचंद सोळंकी (वय 43 रा. बिबवेवाडी, कोंडवा रोड, पुणे व ह.मु. एम.एस. गेस्ट हाऊस बी 402 राम मनोहर लोहिया हॉस्पिटल समोर, नवी दिल्ली) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार ते धर्मगुरू उत्तम मुनी महाराजांच्या सेवेकरींच्या सेवेसाठी दुचाकी घ्यावयाची असल्याने या वाहनाचा पसंतीचा नंबर बाबतची माहिती घेण्यासाठी धुळे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात गेले होते तेव्हा घटना ही घडली.

Deshdoot
www.deshdoot.com