धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील मालेगाव रोडवर काल रात्री लुटीची घटना घडली. तुलसी टायर येथे ग्राहक बनून आलेल्या दोघांनी दुकानातील दोघा भावांना चाकुने भोसकून त्यांच्याकडील

25 हजारांची रोकड लुटून नेली. दरम्यान दोघा भावांना जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांना दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

रुपेश विठ्ठल चौधरी (वय 48) आणि राजेश चौधरी (वय 50) रा. बडगुजर कॉलनी, देवपूर, धुळे अशी दोघा जखमींची नावे आहेत.

त्यांचे मालेगाव रोडवरील रेल्वे क्रॉसिंगच्या पुढे शनीमंदिराजवळ तुलसी टायर नावाचे दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास रुपेश चौधरी हे दुकान बंद करत असतांना ग्राहक बनून दोन जण आले. त्यांनी चारचाकी वाहनाचे टायर विकत पाहीजे, असे सांगितले.

मात्र आता दुकान बंद झाल्याचे दोघा भावंडांनी त्यांना सांगितले. तेव्हा ग्राहक बनून आलेल्या दोघांनी दुकान उघडा, असे सांगत दमबाजी केली. त्यास विरोध करताच एकाने राजेश चौधरी यांच्या हातातील 25 हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकाविण्याचा प्रयत्न केला.

राजेश यांच्याकडून विरोध होत असल्याने दुसर्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हे पाहून रुपेश हे त्यांच्या भावाला वाचविण्यासाठी धावला असता त्यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला.

त्यांच्या पोटावर आणि हातावर चाकूने वार केल्यामुळे चौधरी बंधू जखमी झाले. तोपर्यंत दोघे लुटारू 25 हजाराची रोकड घेऊन पसार झाले.

दोघां भावंडांनी जखमी अवस्थेत रुग्णालय गाठले. त्यानंतर शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राजेश चौधरी यांच्या फियादीवरुन दोन अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील करीत आहेत.