शाळा वाचविण्यासाठी धडपड

शाळा भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव रद्दबातल करा, शाळा व्यवस्थापन समितीचे आंदोलन
शाळा वाचविण्यासाठी धडपड

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील भंगार बाजारमधील साबीर नगरातील महापालिका उर्दू शाळा क्र. 20 ही नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड यांना भाडेतत्वावर देण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे.

शाळा भाडेतत्वावर दिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल व शिक्षकांवर गदा येईल. त्यामुळे ठराव रद्द बातल करावा, यासाठी शाळा व्यवस्थापन समितीतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देवून निदर्शने करण्यात आली.

शाळा वाचविण्यासाठी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जमिरुल हक अब्दुल वहाब, उपाध्यक्ष जमिल युसूफ शाह, मन्नान अय्युब अन्सारी, कय्युम मो. इस्माईल, जमिल शाह मुसूफ शाह, जमिरुल हक अ. वहाब आदींसह अन्य सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी, महापौर, आयुक्त, उपायुक्त, महापालिका प्रशासन अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साबीर नगरमधील महापालिका उर्दू शाळा क्र. 20 ही शाळा लोकसहभागातून तयार केलेली पहिली डिजीटल शाळा असून सदर शाळेची स्थापना 1923 मध्ये झाली आहे.

शाळेतून राजकीय, सामाजिक, व्यक्ती, डॉक्टर, अभियंता, शिक्षक इत्यादी घडले आहेत. परंतू 29 जुन 2021 रोजी महासभेत सदर शाळा नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड या खासगी संस्थेला नाममात्र भाडेतत्वावर देण्याचा ठराव करण्यात आला. हा ठराव करतांना शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, महापालिका शिक्षण मंडळ यांना विश्वासात घेण्यात आले नाही व पुर्व कल्पना न देता ठराव करण्यात आला.

वास्तविक सदर शाळेत सुमारे 300 विद्यार्थी दुपारच्या सत्रात शिक्षण घेत असून 11 शिक्षक कार्यरत आहेत. तसेच सकाळच्या सत्रात महापालिका शाळा क्र. 34 भरवली जाते. या शाळेतही दोन शिक्षक कार्यरत असून 60 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत नऊ वर्ग खोल्या असून मुख्याध्यापक दालन, प्रयोग शाळा, डीजीटल वर्ग खोली आहेत. ही शाळा शहराच्या मध्यभागी असून अल्पसंख्यांक वस्तीत आहे.

अल्पसंख्यांक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. असे असतांना आरटीई शिक्षण कायदा 2009 अन्वये शाळेच्या एक किमी अंतरावर इतर खासगी संस्थेस शाळा चालविण्यास मान्यता देणे हे कायद्याला अनुसरुन नाही. त्याच प्रमाणे धुळे महापालिका शिक्षण मंडळ अंतर्गत संपुर्ण शहरात मराठी माध्यमाच्या आठ शाळा व उर्दू माध्यमाच्या 12 शाळा सुरु असून अनेक महापालिकेच्या शाळा बंद पडल्याने त्या इमारती रिकाम्या पडल्या आहेत.

उलट उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या असल्याकारणाने वर्ग खोल्या अपुर्‍या पडतात. म्हणून बहुतेक शाळा दोन सत्रात भरवल्या जात आहेत. तरीही सदर शाळा खासगी संस्थेत भाडेतत्वावर देणे म्हणजे दोन शाळा बंद करणे होय. असे निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्र शासनाने दि. 5 मार्च 2021 रोजी संपुर्ण राज्याची आदर्श शाळा यादी जाहीर केली. या आदर्श शाळांच्या यादीत महापालिका शाळा क्र. 20 चाही समावेश आहे. म्हणजे या शाळेची गुणवत्ता शासनाच्या निदर्शनास आली आहे. तसेच सदर शाळेला आयएसओ प्रमाणपत्राने सन्मानीत करण्यात आले आहे. याच कारणाने महापालिका आयुक्त यांनी आदर्श शाळा बांधकामाबाबत पत्र देवून आदर्श शाळा नव्याने बांधण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

महापालिका शाळा क्र. 20 ही प्रगतीपथावर असलेली मॉडर्न शाळा करण्याच्या मार्गावर आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले जाते. त्यामुळे ठराव रद्दबातल करावा असे निवेदनात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com