धुळे जिल्ह्यातील सुपुत्राचा देशभर वाजतोय डंका

भारतात करोनाची पहिली रॅपीड सेल्फ टेस्ट बनविण्याचा विक्रम, धुळ्यात झाले महाविद्यालयीन शिक्षण
धुळे जिल्ह्यातील सुपुत्राचा देशभर वाजतोय डंका

अनिल चव्हाण - Dhule - धुळे :

जीवनात ध्येय निश्चित करुन ध्येयाकडे जाण्यासाठी प्रचंड परिश्रम घेण्याची तयारी असेल तर हमखास यश मिळते. मात्र यासाठी आत्मविश्वासाच्या बळावर दमदार पाऊले टाकून पुढे मार्ग क्रमण करण्याची जिद्द असायला हवी. अशाच जिद्दीचे उदाहरण म्हणून सध्या धुळे जिल्ह्यातील सुपुत्र राहुल सुभाष पाटील यांचे नाव अभिमानाने घेता येईल.

आपल्या ज्ञानाच्या, परिश्रमाच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी सुरु केलेल्या‘माय लॅब’च्य माध्यमातून त्यांच्या कार्याचा डंका देशभर वाजतो आहे.

देशभर नव्हे तर विदेशातही नाव कमवता आले याचा निश्चितच आनंद आहे. परंतु माझे बालपण, शिक्षण धुळ्यात झाले आहे. तुषार, विजय आणि मी आम्हा तिघा मित्रांची घट्ट मैत्री पहाता आम्हाला त्रिमूर्ती म्हणून ओळखले जात असे. आजही आम्ही सोबत आहोत. थाळनेरात काका आणि कुटुंबातील अन्य सदस्य राहतात. त्यामुळे धुळ्यात येणे होतेच. खरे तर या मातीची ओढच मला खेचून आणते.

‘माय लॅब’चे सीईओ,राहुल पाटील

31 डिसेंबर 2019 ला चीनमध्ये करोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर या विषाणुने अवघ्या काही दिवसात जगभर आपले हात-पाय पसरविले. अर्थात भारतातही करोनाने कहर माजविला. मागीलवर्षी हा आजार आणि यावरील उपचाराबाबत कुणालाच फारसे काही माहित नव्हते.

त्यामुळे परिस्थिती गोंधळाची आणि गांभीर्य वाढविणारी होती. अशाच परिस्थितीत पुण्यातील ‘माय लॅब’ने कोवीड विषाणुची बाधा झाली आहे काय? हे तपासणारी रॅपीड टेस्ट अमलात आणली. त्यांच्या या कामगिरीमुळे माय लॅबचे नाव सर्वदूर पसरले. एव्हढ्यावरच न थांबता आता देशातील पहिली कोरोना सेल्फ टेस्ट विकसीत करण्याचा मान देखील या लॅबला अर्थात या मागील मास्टर माईंड असणार्‍या राहुल पाटील यांना मिळाला आहे.

खरेतर ही एका जिद्दी तरुणाची कहाणी आहे. एखाद्या चित्रटपटाला शोभावा असाच राहुल सुभाष पाटील या तरुणाचा प्रवास आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेले थाळनेर हे त्यांचे मुळ गाव. आजही काका व परिवारातील अन्य सदस्य याच गावात राहतात.

वडिल बँकेत नोकरीला असल्यामुळे धुळ्यातील रहिवासात राहुल पाटील यांचे शिक्षण याच शहरातील श्री. एकवीरा हायस्कुलमध्ये झाले. दहावी नंतर त्यांनी शहादा येथे प्रवेश घेतला. मात्र लहान पणापासूनच हुशार, अतीशय परिश्रमी आणि स्वतःची वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या राहुल पाटील यांनी त्याचवेळी आपले ध्येय निश्चित केले. कोणत्या क्षेत्रात जायचे, काय बनायचे हे ठरविल्यामुळेच बारावी नंतर त्यांनी बायो टेक्नॉलॉजीला प्रवेश घेवून कोल्हापूर गाठले.

पदवीचे शिक्षण पूर्ण करुन त्यांनी नोकरीच्या प्रयत्नात एक-दोन कंपन्यांमध्ये अनुभव घेतला. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी हरवलेले आईचे छत्र आणि कालांतराने वडिलांचीही सुटलेली साथ यामुळे त्यांच्या मनावर खोलवर आघात झालाच.

पण स्वतःच्या हिंमतीने स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही. त्यांच्या याच जिद्दीने त्यांना नोकरीत रमविले नाही. त्यामुळे मिळालेला चांगला जॉब सोडून सात वर्षांपूर्वी पुण्यातीलच एका भाडेतत्वावर घेतलेल्या खोलीत त्यांनी लॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावेळी आपल्या दोन-तीन संवगड्यांना सोबत घेवून सन 2013 मध्ये ‘माय लॅब’चा श्रीगणेशा केला.

स्वतःच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असलेल्या राहुल पाटील यांनी वेगवेगळ्या आजारांसंदर्भात अगदी कॅन्सर टेस्टही केली. मागील वर्षी कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर सारा देश भयभीत असतांना आणि देशभरातील तज्ज्ञ यंत्रणा यावर उपाय शोधत असतांना माय लॅबने यावरील रॅपीड टेस्ट आमलात आणली. यासाठीची त्यांना केंद्राकडून परवानगी तर मिळाली. पण लगेचच देशभर लॉकडाऊन झाले. टेस्टसाठी लागणारे मटेरियल आणायचे कसे हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. अशावेळी त्यांना भारत सरकारचे स्वास्थ मंत्रालय कॅबीनेट, वेगवेगळ्या राज्यांचे आरोग्य मंत्रालय आणि विशेषतः इंडीयन पोस्ट आर्म सर्व्हिसेस यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. केंद्र व राज्य शासनाच्या पाठिंब्यामुळेच आपण कोरोना बाबतची टेस्ट यशस्वीपणे बाजारात आणू शकलो, असे ते निसंकोचपणे सांगतात.

छत्रपती शिवरायांनी मोजक्या मावळ्यांना घेवून शपथ घेवून अवघ्या स्वराज्याची उभारणी केली. महाराष्ट्राच्या मातीतील शिवरायांचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या मराठमोळ्या तरुणाने दोन-तीन मित्रांना घेवून सुरु केलेला कारोभार आज एका प्रशस्त रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट लॅबच्या माध्यमातून नावारुपास आला आहे.

पुण्यातील बाणेर मधून चाललेले प्रशासकीय काम आणि लोणावळात असलेला निर्मिती प्रकल्प मिळून ‘माय लॅब’मध्ये आज 200 हून अधिक सहकार्‍यांचे हात राबत आहेत. अर्थात या सार्‍या विस्ताराचे श्रेय राहुल पाटील यांनाच असून त्यांच्या कर्तृत्वाचा डंका देशभर वाजत असल्याचे बघून अवघ्या खान्देश वासीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com