वन विभागाच्या मदतीने विहिरीबाहेर काढले दुर्मीळ प्रजातीचे मांजर

वन विभागाच्या मदतीने विहिरीबाहेर काढले दुर्मीळ प्रजातीचे मांजर

कापडणे - Kapadane - प्रतिनिधी :

येथील कापडणे- न्याहळोद रस्ता परिसरातल्या विहिरीत कालपासुन पडलेले, अतिशय दुर्मिळ प्रजातीचे उद मांजर (पान मांजर) आज (दि.20) वन विभागाच्या मदतीने काढण्यात आले. सचिन भगवान पाटील यांच्या शेतातील विहिरीत हे दुर्मीळ प्रजातीचे मांजर आढळले.

वन विभागाच्या अधिकार्‍यांनी या मांजरास सोनगीर वन विभाग परिसरातील सुरक्षितस्थळी सोडून दिले. देशात मोठ्या प्रमाणात या प्राण्याची तस्करी होत असल्याने भारत सरकारने हा प्राणी टिकविण्यासाठी व वाचविण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. अशातच हा दुर्मीळ प्रजातीचा प्राणी आढळल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

येथील न्याहळोद रस्त्यावरील विहिरीत एक वेगळाच प्राणी सचिन भगवान पाटील यांना दिसला. मांजरा समान पण आकाराने मोठ्या असलेल्या या प्राण्याचा फोटो सचिन पाटील यांनी सेवानिवृत्त वनपाल वाल्मीक पितांबर पाटील यांना पाठवला. वाल्मीक पाटील यांनी याबाबत वन विभागास याबाबत माहित दिली.

नगाव विभागाच्या वनसंरक्षक सारिका निकुंभे यांनी या माहितीची तात्काळ दखल घेतली. नगाव वनसंरक्षक सारिका निकुंभे यांच्यासह सोनगीर वनसंरक्षक श्री.बोरसे तसेच दीपक माळी, देवसिंग दादा आदींनी शेत गाठत या दुर्मीळ प्रजातीच्या प्राण्याची पाहणी केली.

हा उत मांजर प्राणी पकडण्यात येवुन सोनगीर येथे सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी अशोक पाटील, सचिन पाटील, अमोल पाटील, संदीप पाटील, उपेंद्र पाटील, महारु पाटील, नाना पाटील, हंसराज पाटील आदी उपस्थित होते.

चारच्या गटात राहते ही दुर्मीळ प्रजात

देखणा प्राणी म्हणून या उत मांजरची ख्याती आहे. या पानमांजरांची कातडीसाठी तस्करी होत असल्याने ही प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भारतात दोन प्रकारचे उद मांजर आढळतात. हा प्राणी किमान चारच्या गटाने राहत असल्याने या परिसरात अजून उत मांजर असण्याची चिन्हे आहेत.

भारत सरकारने ही प्रजाती टिकविण्यासाठी व वाचविण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. कापडणे-न्याहळोद परिसरात या दुर्मीळ प्रजातीचे वास्तव्य आढळुन आल्याने, यावर सबंधित विभागाने लक्ष केंद्रीत करावे अशी मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com