विहिरीत पडलेल्या दोन बिबट्यांना जीवदान

विहिरीत पडलेल्या दोन बिबट्यांना जीवदान

पिंपळनेर - Pimpalner - वार्ताहर :

साक्री तालुक्यातील मोदरपाडा शिवारातील विहिरीत पडलेल्या दोन बिबट्यांना वनविभागाच्या पथकाने जीवदान दिले.

तब्बल पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही बिबट्यांना बाहेर काढण्यास यश मिळविले. बिबट्याने जंगलाकडे धुम ठोकली.

मोदरपाडा येथील पुंडलीक नारायण बागुल यांच्या गाव शिवारातील शेतातील विहिरीत दोन बिबटे (नरमादी) पडले असल्याचे सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आले.

याबाबत वनरक्षक दीपक भोई यांना कळविण्यात आले. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अरूण माळके, वनपाल बच्छाव, आर.डी. मोरे, वनरक्षक दीपक भोई, योगेश भिल, देवा देसाई, काळु पवार, सुमित कुवर, सागर सुर्यवंशी, तानाजी कुवर, दिलीप पारोळे आदी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

प्रथम पथकाने ग्रामस्थांना दुर जाण्यास सांगितले. त्यानंतर शांतता ठेवून विहिरीत तीन शिडी एकमेकांना बांधून विहिरीत सोडल्या.

त्यानंतर 11 वाजता एक बिबट्या शिडीव्दारे बाहेर पडला. तर दुसरा दुपारी 2.45 वाजता निघाला. दोघा बिबट्यांनी जंगलात, डोंगराच्या दिशेने धुम ठोकली.

वनविभागाने कोणालाही इजा होवून न देता दोन्ही बिबट्यांना सुरक्षीतपणे बाहेर काढल्याने त्याचे ग्रामस्थांनी कौतूक केले. या कामासाठी वनविभागाला ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com