पिंपळनेर - Pimpalner - वार्ताहर :

गहू व तांदळाचा काळाबाजाराचा पंचनामा केलेले वाहन रात्रीतून पळवून नेल्याचे साक्री तालूक्यातील पिंपळनेर येथे उघडकीस आले असून या प्रकरणी दोन स्वस्त धान्य दुकान सील करण्यात आला आहे. तर दोन जणांविरूध्द पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अप्पर तहसीलदार विनायक थविल रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गस्त घालत असतांना माळी गल्लीत पांझरा नदी काठाजवळील स्वस्त धान्य दुकानाजवळ वाहन उभे दिसले. त्यामुळे थविल यांना संशय आला.

त्यांनी वाहनाजवळ जाऊन पाहिले असता वाहनात रेशनच्या गोण्या भरून काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ अप्पर तहसीलदार थविल यांनी पंचनामा करण्यासाठी पुरवठा अधिकारी श्रीमती एस. जे. बागूल यांना सुचना केली. व श्रीमती बागूल यांनी पंचनामा केला.

स्वस्त धान्य दुकान क्र. 13 प्रगती महिला बचत गट मालकीचे असून सदर माल वाहन क्र. एम एच 18 - एए 4312 मध्ये 35 गोणी गहू व एक तांदुळाची गोणी असा मुद्देमाल आढळून आला. कारवाई दरम्यान गाडी चालक तेथून फरार झाला. व गाडी पंक्चर होती, गाडी चालक तसेच गाडीची चावीही तेथे नव्हती.

सदर वाहन रात्री महिला कर्मचार्याला नेणे शक्य झाले नाही, गाडीत जप्त केलेला माल ठेवून तेथून पुरवठा अधिकारी निघून गेल्या, पण सकाळी येऊन पाहिले असता, दुकानाबाहेर पंचनामा केलेली गाडी दिसली नाही, सदर माल पळवून नेण्यात आल्याचे निदर्शनास आले, याबाबत माहिती साक्री तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना देण्यात आली त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

या स्वस्त धान्य दुकानाला जोडून असलेले घोड्यामळ येथे रेणुका दीपक महाजन यांचे स्वस्त धान्य दुकान क्र.16 आहे. त्याचीही पाहणी करण्यात आली व दुकान क्र.13 व 16 सील करण्यात आले, यासंदर्भात गाडी चालक मालक वसीम शकील पटेल, व शंभर रुपये स्टॅम्प पेपरने दुकान चालविण्यासाठी घेणारा मयूर शंकर आढे या दोघांविरोधात पुरवठा निरीक्षक सुशीला जेजीराम बागुल यांनी फिर्याद दिली. त्यावरून भादंवि 109, 379, 353, 341, 506, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.