कोविड- 19 मुळे पालक गमावलेल्या मुलांच्या नियमितपणे संपर्कात राहावे !

जिल्हाधिकारी संजय यादव : जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत निर्देश
कोविड- 19 मुळे पालक गमावलेल्या मुलांच्या नियमितपणे संपर्कात राहावे !

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

कोरोना विषाणूमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडी- अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश कृती दलाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी.एम. मोहन, उपायुक्त शिल्पा नाईक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी मनीष पवार (प्राथमिक), जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी श्री. चव्हाण, जिल्हा परिविक्षा अधिकारी एम. एम. बागूल, निरीक्षण गृहाच्या अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.अमित दुसाने आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, कोरोना विषाणूमुळे एकाच कुटुंबातील दोन्ही पालकांचा म्हणजे आई- वडिलांचा मृत्यू झाला आहे, अशा पालकांच्या निधनामुळे शून्य ते 18 वर्षे वयोगटातील बालके अनाथ झाली आहेत. या बालकांप्रती प्रत्येकाने संवेदनशील राहणे आवश्यक आहे.

या बालकांची भावनिक व वैयक्तिक हानी भरून निघणे अशक्य आहे. मात्र, या बालकांचे शिक्षण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईपर्यंतचे आयुष्य सन्मानाने जगता यावे म्हणून ही मदत आर्थिकदृष्ट्या पूरक ठरणार आहे.

त्यामुळे अशा पात्र बालकांचा शोध घेवून त्यांना ही मदत मिळवून द्यावी. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या प्रस्तावांची पूर्तता करून संबंधितांना लाभ मिळवून द्यावेत. तालुकास्तरावरील कृती दलाच्या बैठका नियमितपणे घेवून कोविड- 19 मुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या मुलांशी संपर्क साधावा. तसेच अशा कुटुंबाना मदत मिळवून द्यावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी सांगितले, कोविड 19 मुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या कुटुंबांसाठी बि- बियाणे, रासायनिक खते मोफत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिक्षणाधिकारी श्री. पवार यांनी सांगितले की, कृती दलाच्या आवाहनानंतर काही शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जात आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. भदाणे यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 15 असून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच या मुलांच्या व कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थांना आवाहन

एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांचे शिक्षण, पुनवर्सन आणि मदतीसाठी धुळे जिल्ह्यातील सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी केले. अधिक माहितीसाठी संबंधित विभागांशी संपर्क साधावा असेही आही आवाहन केले.

बालकांसाठी हेल्पलाइन

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना काही समस्या असल्यास त्यांनी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक 1098, 83089-92222 (सकाळी 8 ते रात्री 8), 7400015518 (सकाळी 8 ते रात्री 8) येथे किंवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, कार्यालय 52, जयहिंद कॉलनी, धुळे, मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह, साक्री रोड, येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्री.भदाणे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com