ऑक्सिजन प्रकल्पासाठी खा. डॉ. सुभाष भामरे यांचा 1 कोटीचा निधी

ऑक्सिजन प्रकल्पासाठी खा. डॉ. सुभाष भामरे यांचा 1 कोटीचा निधी

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन अतिशय महत्वाचा ठरत आहे. धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकिय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत रहावा आणि रुग्णालयाचा स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारला जावा यासाठी खा.डॉ.सुभाष भामरे यांनी पुढाकार घेत स्वतःचा 1 कोटी रुपयांचा खासदार निधी उपलब्ध करुन दिला आहे.

खा.डॉ.भामरे यांच्या निधीमुळे हिरे मेडिकल रुग्णालय ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर होणार असल्याने कोविड रुग्णांसह इतरही गंभीर रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

करोनाची दुसरी लाट सध्या सुरु असून ती अतिशय तीव्र झाली आहे. ही दुसरी लाट कधी पर्यंत सुरु राहिल हे सांगणे कठीण आहे.

त्यातच काही ठिकाणी तिसरी लाट सुध्दा सुरु झाली आहे. अशा स्थितीत धुळे शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांना ऑक्सिजनची कमरता भासू नये, एकाही रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होवू नये, यासाठी खा.डॉ.सुभाष भामरे यांनी महत्वपुर्ण पुढाकार घेतला आहे.

धुळ्यातील एकमेव शासकीय डेडिकेटेड कोविड रुग्णालय असलेल्या हिरे मेडिकल कॉलेजच्या सर्वोपचार रुग्णालयाला स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा करण्यासाठी खा.डॉ. भामरे यांनी आपल्या खासदार निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे.

तसेच त्याबाबत धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांना आणि हिरे मेडिकलच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांना अधिकृत पत्र सुध्दा खा.डॉ.सुभाष भामरे यांनी दिले आहे.

लवकरच हा 1 कोटी रुपांचा निधी जिल्हा प्रशासनाला सोपवला जाईल आणि त्यातून हिरे मेडिकल कॉलेजला स्वतःचा ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल.

धुळ्यातील कोविड रुग्णांसाठी ही अतिशय उपयुक्त ठरणारी मदत खा.डॉ.भामरे यांनी आज दिल्याने जिल्हाधिकारी संजय यादव, अधिष्ठाता डॉ.सापळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com