इडीची नोटीस आली तेव्हाच राजकारण बदलले
धुळे

इडीची नोटीस आली तेव्हाच राजकारण बदलले

Balvant Gaikwad

खा.सुप्रिया सुळे : धुळ्यात राष्ट्रवादीचा मेळावा, विकासकामांना दिल्या भेटी

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना इडीची नोटीस आली तेव्हाच राज्याचे राजकारण बदलले. विरोधकांनी अनेक खोटे आरोप केले. जेवढे आपल्या पक्षातील पदाधिकारी फोडले, तेवढे मतदार आपल्याकडे आले. त्यामुळे महाराष्ट्र एकवटला. तेव्हाच राज्याची अस्मिता जागी झाली. असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या खा.सुप्रिया सुळे यांनी येथे केले.

शहरातील राजर्षी शाहु नाट्य मंदिरात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे, किरण शिंदे, इर्शाद जहागीरदार, संदीप बेडसे, किरण पाटील, हेमा गोटे, तेजस गोटे, रणजित राजे भोसले, रामकृष्ण पाटील, कैलास चौधरी, डॉ.जितेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.
खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, निवडणुकांमध्ये आपली ताकद कुठे कमी पडली असेल तर सर्वांनी आत्मचिंतन केले पाहिजे. माझ्याही दोन हक्काच्या जागा थोड्या मतांसाठी पडल्या. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. ही संघटना म्हणून आपली जबाबदारी आहे. आता पुढे साडेचार वर्षांनी निवडणूका आहेत. अभ्यासाला वेळ आहे. तसे तर महाविकास आघाडीचे सरकार आता पुढील 15 वर्ष चालेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. आपण सभागृहात ज्या घोषणा दिल्या त्या जिल्हाभरात गाजतील तेव्हा राष्ट्रवादीचे चांगले काम सुरू आहे, असे वाटेल, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकादरम्यान त्यांच्या पक्षात इनकमिंग वाढले. कुठलेही कॉलीटी कन्ट्रोल नव्हते. त्यामुळे त्यांचा स्वतःचा कार्यकर्ता दुखावला गेला. त्यांच्यात आपल्याला पडायचे नाही. मात्र हे आपल्याला शिकण्यासारखे आहे. आल्यातील तिकडे गेले ते आता इकडे नको. सच्चा माती, पक्षाशी , प्रेमाचा व विश्वासाचा कार्यकर्ता काणे आहे हे आपल्या पक्षाला कळाले असल्याचे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.

चेकींग करून इनकमिंग करा- जिल्ह्यात किरण शिंदे व किरण पाटील यांनी पक्षाचे काम एकनिष्ठतेने केल्याचे सांगत, खा. सुळे यांनी त्याचे कौतूक केले. तसेच आता आपल्या पक्षात चेकींग करूनच इनकमींग करावे. कुणासाठीही तडजोड केली जाणार नाही. खरेपणा कुणीही सोडू नये. तोच आपल्याला भावला आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. हे जनतेमुळेच झाले हे देखील कोणीही विसरू नये, असेही त्यांनी सांगितले.

तर रॉकेल सुरू करण्यासाठी लढा देवून- मागील सरकारने उज्वला योजना राबविली. त्यामुळे रॉकेल बंद झाले. या योजनेला विरोध नाही. परंतू गरिब महिलांना पुन्हा महागडे सिलींडर घेणे परवडत नाही. त्यामुळे गरिब महिलांसाठी पुन्हा रॉकेल सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी गरज पडलीतर केंद्र सरकारशी देखील लढा देवू, असेही खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

अमरिशभाईंच्या भाजप प्रवेशाने वेदना

शिरपूरातील अमरिशभाई पटेल यांनी भाजपात प्रवेश केल्याने वेदना झाल्या. अमरशभाई आणि पवार कुटुंबाचे कौटुंबिक संबंध आहेत. ते काँग्रेसच्या विचारांनी वाढले आहेत. त्यांना काही अडचणी असतील म्हणून त्यांनी भाजपात प्रवेश केला असावा. पंरतू मी त्यांची भेट घेणार असून त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेणार असल्याचेही खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com