कृषी महाविद्यालयात अधिकारी, कर्मचार्‍यांचे आंदोलन

कृषी महाविद्यालयात अधिकारी, कर्मचार्‍यांचे आंदोलन

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

राज्यातील बहुतांश संस्थेतील शासकीय अधिकारी व कर्मचार्‍या सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

परंतु राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील अधिकारी व कर्मचार्‍यांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही.

सातवा वेतन आयोग व आश्वासित प्रगती योजना लागू करण्याकरिता शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. परंतु त्यात यश मिळाले नाही.

त्यामुळे चारही कृषि विद्यापीठातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सातवा वेतन आयोग व आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी आज सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचार्‍यांनी शहरातील कृषि महाविद्यालय काळ्या फिती लावून आंदोलन केले.

यावेळी कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रा. डॉ. एस.पी. सोनवणे यांच्या हस्ते कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सी. डी. देवकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. डॉ. सी. डी. देवकर यांनी सदर निवेदन कृषि विद्यापीठातील वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात येईल असे सांगितले.

यावेळी तंत्र अधिकारी डॉ. संदीप पाटील व कृषि सहाय्यक घनश्याम परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले.

वास्तविक पाहता कोरोना विषाणू संकट काळात देखील विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्य जबाबदारीने पार पाडत आहेत.

सातवा वेतन आयोग व आश्वासित प्रगती योजना लागू न केल्याने कृषि विद्यापीठ अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.

प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल, असेही निवेदनात म्हटले आहे. त्यात दि 27 ते 1 नोव्हेंबरपर्यंत सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून दुपारी 1.30 ते 2 यावेळेत आंदोलनाचा भाग म्हणून श्रमदान करतील. दि.2 ते 5 पर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी लेखणीबंद आंदोलन करतील.

दि. 6 रोजी चारही कृषि विद्यापीठांचे सर्व अधिकारी व कर्मचारी एक दिवसाची सामुदाईक रजा देऊन आंदोलन करतील. तरीही मागण्या मान्य झाल्या नाही तर दि. 7 पासून सर्व अधिकारी व कर्मचारी बेमुदत लेखणीबंद आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा म. फु. कृ. वि. राहुरी कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. सी. डी. देवकर, डॉ. एस.पी. सोनवणे, डॉ. एस.बी. भणगे, डॉ. जी. बी. काबरे, डॉ. खुशाल बराटे, डॉ. सी. व्ही. पुजारी, डॉ. एम. एस. महाजन, डॉ. राहुल देसले, डॉ. पी.एन. शेंडगे, डॉ. पी. डी. सोनवणे, डॉ. डी. एच. कंखरे, डॉ. टी. डी. पाटील प्रा. श्रीधर देसले, डॉ. संदीप पाटील तसेच कृषि महाविद्यालय, कृषि संशोधन केंद्र, कृषि तंत्र विद्यालय व कृषि संशोधन केंद्रातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com