मास्क न वापरणार्‍यांवर मोबाईल कॅमेर्‍याचा वॉच

मास्क न वापरणार्‍यांवर मोबाईल कॅमेर्‍याचा वॉच

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

सोशल डिस्टन्सिंग, मास्क न वापरणार्‍यांवर मोबाईल कॅमेर्‍यातून लक्ष ठेवले जाणार असून त्यासाठी महापालिका क्षेत्रात क्षेत्रीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासनाने सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर, आस्थापना, दुकानात पाच पेक्षा अधिक लोक नको, मोठे समारंभ किंवा सोहळ्यांना परवानगी नाही.

मात्र, लग्न कार्यात व अंत्यविधीला 50 पेक्षा अधिक व्यक्ती नको, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू किंवा दारूच्या सेवनावर प्रतिबंध आहे. दुकाने व इतर आस्थापना हे अटी व शर्तींची तंतोतंत अंमलबजावणी होते आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी अधिकार्‍यांची झोनल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

झोनल अधिकार्‍यांनी मिशन बिगेन अगेनची शासन नियमाप्रमाणे प्रभावी अंमलबजावणी होते आहे किंवा नाही याची वेळोवेळी पाहणी करुन ठरवून दिलेल्या वेळी दुकाने सुरू आहेत किंवा नाही, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर व मास्कचा वापर होतो आहे किंवा नाही तसेच वाहतूक नियंत्रण आदींचे आपल्या वैयक्तिक भ्रमणध्वनीव्दारे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.

संबंधित दुकान, आस्थापना चालक शासन आदेशाचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुध्द संबंधित झोनल अधिकार्‍यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, मुंबई पोलिस अधिनियम, भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com